खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते कुसगाव अशी 19.80 किमीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाच्या कामास मोठी विलंब झाला असून परिणामी आता प्रकल्प खर्चात मोठी वाढ झाली आहे. मिसिंग लिकच्या खर्चात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 6850 कोटींचा खर्च 7500 कोटीच्या घरात जाणार आहे. मिसिंग लिंकचे काम प्रचंड आव्हानात्मक असल्याने कामास विलंब होत असल्याचे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.
एमएसआरडीसीच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर अडीच तासात पार करता येत आहे. मात्र आता हा द्रुतगती मार्ग वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यास अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे महामार्गावर गर्दीच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी असते. अशात येत्या काळात वाहनसंख्या आणखी वाढणार असल्याने एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. खोपोली ते कुसगाव अशी 19.80 किमीच्या मिसिंग लिंकच्या कामाला दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली होती.
याविषयी एमएसआरडीसीकडे विचारणा केली असता प्रकल्प खर्च वाढ झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. अद्याप प्रकल्प पूर्ण व्हायचा असून मार्चपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर नेमकी किती खर्च या प्रकल्पासाठी झाला हे स्पष्ट होईल. मात्र आतापर्यंत अंदाजे 10 टक्के खर्च वाढ झाल्याचा अंदाज असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे 6850 कोटींचा खर्च आता 7500 कोटींवर गेला असल्याचे म्हटले जात आहे.
डोंगराखालून, तलावाखालून बोगदे नेणे, उंचावर केबल स्टेड पूल बांधणे अशी आव्हानात्मक कामे या प्रकल्पात आहेतच. पण त्याचवेळी उंचावर, दर्या खोर्यात काम करताना उन्ह, वारा, पाऊस सगळ्यांचा समाना करावा लागतो. त्यामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक असल्यानेच प्रकल्पास विलंब झाल्याचेही सुचित करण्यात आले आहे.