मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे लवकरच दहा पदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 16 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 94.5 किमीचा असून तो 2002 साली सुरू झाला. या महामार्गावरून मुंबई ते पुणे प्रवास अडीच तासांत करता येतो. या रस्त्यावरून दररोज 65 हजारांहून अधिक वाहने धावतात. येथे दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि अपघात पाहता सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी महामार्गाचे आठ पदरीकरण करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य शासनाकडे पाठवला होता. तो रद्द करून आता या महामार्गाचे दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामुंबईचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येत आहे. तसेच डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरू होत आहे. यामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार करून दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 16 हजार कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.
यापैकी 200 कोटी रुपये भूसंपादनासाठी आवश्यक आहेत. दहा पदरीकरणाच्या कामात सहा बोगदे बांधण्यात येणार आहेत. यासाठी 85 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाईल. महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहतूक कोंडी कमी होईल व प्रवासाचा वेग वाढेल.