शौचालयदिन विशेष file photo
मुंबई

Mumbai public toilet shortage: राजधानी मुंबईत सार्वत्रिक शौचालय टंचाई !

महिलांसाठीची शौचालये अत्यल्प

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दरवर्षी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येत असला तरी मुंबई सारख्या राजधानीच्या शहरात आजही शौचालयांची प्रचंड टंचाई असून उपलब्ध असलेली शौचालये एक तर प्रचंड घाण किंवा मोडकळीस आलेली आहेत. त्यातही महिलांसाठीची शौचालये अत्यल्प आहेत.

शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट असून येथे जाणेही मुंबईकरांना नकोसे वाटते. नेमके शौचालय कुठे आहे ? हे कोणाला विचारायचीही गरज भासणार नाही. कारण शौचालयाच्या आजूबाजूला पसरलेली दुर्गंधी आल्यावर आपसुकच शौचालयाचा पत्ता कळतो, अशी स्थिती आहे.

मुंबईतील सार्वजनिक शौचालय पूर्वी सुलभ शौचालय नावाने चालवण्यात येत होती. आजही सुमारे 1250 पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालय खाजगी संस्था यांच्यामार्फत चालवण्यात येत आहेत.

यातील काही शौचालय वापरण्यायोग्य आहेत. अन्यथा काही संस्थांकडे असलेली शौचालयही फारशी चांगली नाहीत. तरीही नाईलाजाने लाखो मुंबईकरांसह देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना घाणेरड्या व दुर्गंधीयुक्त शौचालयाचा वापर करावा लागत आहे. एका सर्वेनुसार पाणी आणि वीज नसलेल्या शौचालयांची संख्या 49 टक्के इतकी आहे.

92,300 शौचालय अस्तित्वात

मुंबई शहर व उपनगरात सध्या सुमारे 92,300 शौचालय असून यात झोपडपट्टीमधील शौचालयाचाही समावेश आहे. महिला शौचालयाची मोठी कमतरता असून दर पाच सार्वजनिक शौचालयांपैकी फक्त एक शौचालय महिलांसाठी उपलब्ध आहे. पुरुषांसाठी असलेल्या एका सामुदायिक शौचालयाचा वापर 86 पुरुष करतात, तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालयाचा वापर 81 स्त्रिया करतात.

वास्तविक स्वच्छ भारत अभियाना‌’च्या मापदंडानुसार एका शौचालयाच्या वापर प्रत्येकी 35 पुरुष आणि 25 स्त्रिया या प्रमाणात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबईतील लोकसंख्या व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन सर्व उपनगरात अजून किमान 18 ते 20 हजार शौचालयाची आवश्यकता आहे.

एक मजली शौचालय

मुंबईतील 24 विभागातील जुन्या शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात बहुसंख्य शौचालये सी-1 या अतिधोकादायक श्रेणीत आढळून आली आहेत. शौचालयांची निकड लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबईतील सर्व विभागांमध्ये आरसीसी पद्धतीची तळमजला अधिक एक मजला प्रकारची शौचालये बांधली जात आहेत. यातून 22,774 शौचकुपे उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT