Mumbai Protest Pudhari
मुंबई

Mumbai Protest: मुंबईत तुषार गांधी, अभिनेता इमरान खानसह ६०० आंदोलकांची धरपकड

नाना चौकात ४०० आंदोलकांना ताब्यात घेतले; ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारे रस्ते बंद, हुतात्मा चौकात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शनिवारी विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मुंबईत सुमारे ६०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना सायंकाळी सोडून देण्यात आले.

कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानाकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी नाना चौक परिसरात अडवले. या ठिकाणी सुमारे ४०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

‘हम भारत के लोग’ या संघटनेचे प्रमुख आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही आंदोलनापूर्वी पोलिसांनी वांद्रे येथून ताब्यात घेतले होते. त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब पोलीस ठाण्यात दाखल झाले. तुषार गांधी यांची सुटका होईपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग केले. नाना चौकातील आंदोलनात फिरोज मिठीबोरवाला, दिशा स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या हर्षदा बोराडे, ॲड. साम्या कोरडे, अभिनेता इमरान खान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे, डॉ. पूजा चिंचोले, हेमलता कौशिक, रक्षंदा चावला, प्रज्ञा प्रभुलकर, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नताशा दराडे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांचा सहभाग होता.

शिवाजी पार्कला बंदोबस्त

दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातही पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त वाढविला. परिसरात बॅरिकेडिंग करून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT