बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण.  (file photo)
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : शुभम लोणकर विरुद्ध लूकआउट सर्कुलर जारी

Baba Siddique murder case | सिद्दीकींच्या हत्येसाठी लोणकरने शस्त्रे पुरविल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी फरार असलेला संशयित आरोपी शुभम लोणकर याच्याविरुद्ध लूकआउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गेल्या रविवारी रात्री उशिरा प्रवीण लोणकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अटक झालेला प्रवीण हा तिसरा आरोपी असून त्याच्यासह त्याचा भाऊ शुभम लोणकरने या हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे.

या गुन्ह्यात बिष्णोई गॅँगचा सहभाग असल्याचा दावा सरकारी वकिलांनी दावा केला. यामुळे ही हत्या बिष्णोई गॅँगनेच घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्याकांडातील गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना आधीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्या चौकशीत शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा, मोहम्मद झिशान अख्तर, शुभम लोणकर, प्रवीण लोणकर ही अन्य आरोपींची नावे समोर आली होती. लोणकर बंधू पुण्यात राहात असल्याने गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला गेले होते. रविवारी रात्री उशिरा प्रवीण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता पोलीस प्रवीण लोणकर याचा भाऊ शुभम लोणकरच्या शोधात आहेत.

Shubham Lonkar : लोणकर बंधू बिष्णोई गॅँगसाठी काम करतात

या प्रकरणाच्या चौकशीत प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम यांनीच तिन्ही मारेकर्‍यांना हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले होते. जानेवारी महिन्यात शुभम याला घातक शस्त्रांसह पुणे पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो काही महिने तुरुंगात होता. नंतर तो जामिनावर बाहेर आल्यानंतर तो जूनपासून फरारी झाला होता. दोन्ही लोणकर बंधू बिष्णोई गॅँगसाठी काम करत होते, असे तपासात उघडकीस आले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT