Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai crime : एमडी खरेदी करताना कॉन्स्टेबल अटकेत

चार ग्रॅम एमडी जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यासाठी मालवणी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात चक्क पोलिस दलातील कॉन्स्टेबलच अडकला. जोगेश्वरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल किरण इंदुलकर याला मेफेड्रोन (एमडी) खरेदी करताना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्यासाठी त्याने १५ हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे.

मालवणी परिसरात एमडीची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची नजर होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांपैकी एका कर्मचाऱ्याने ड्रग्ज विक्रेत्याच्या भूमिकेत राहून व्यवहार करण्याचे ठरवले.

मालवणीतील गेट क्रमांक आठजवळ इंदुलकर एमडी खरेदी करण्यासाठी आले. त्यांनी ५० ग्रॅम एमडीची मागणी केली. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात चार ग्रॅम एमडीसाठी १५ हजार रुपये दिले. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एमडी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.

इंदुलकर यांची यापूर्वी मालवणी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्या काळात त्यांना परिसराची चांगली माहिती होती. स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध असल्याच्या तक्रारीनंतर त्यांची मालवणीतून बदली करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सध्या ते जोगेश्वरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

इंदुलकर यांच्यावर यापूर्वी परवानगीशिवाय कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.

रॅकेटशी संबंधाचा तपास

इंदुलकर केवळ एमडी खरेदी करण्यासाठी गेले होते की त्यांचा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीशीही संबंध आहे, याचा तपास मालवणी पोलिस करत आहेत. त्यांनी यापूर्वीही अमली पदार्थ खरेदी केले होते का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यालाच एमडी खरेदी करताना अटक झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. इंदुलकर यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि अमली पदार्थ विक्रेत्यांशी असलेल्या संभाव्य संबंधांचीही पोलिस चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT