मुंबई: मुंबईसारख्या महानगरात गुन्ह्यांचा तपास केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर अवलंबून राहिलेला नाही. शहरात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही नेटवर्कमुळे प्रत्येक हालचाल डिजिटल स्वरूपात नोंदवली जात आहे.
त्यामुळे आरोपींचा माग काढणे, घटनाक्रमाची पुनर्रचना करणे आणि न्यायालयात भक्कम पुरावे सादर करणे मुंबई पोलिसांसाठी अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही हा मुंबई पोलिसांच्या तपासातील सर्वात विश्वासार्ह ‘डिजिटल साक्षीदार’ ठरत आहे.
यंदाच्या वर्षात घडलेल्या अनेक गाजलेल्या गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण मुंबईतील पायधुनी विषबाधा प्रकरणात संबंधित परिसरातील कॅमेऱ्यांमधील हालचालींचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
त्याचप्रमाणे मुंबई लोकलमधील तरुणाच्या हत्येप्रकरणात रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म आणि बाहेरील रस्त्यांवरील कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
मंगळवारी २३ जून रोजी रात्री चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये २२ वर्षीय मयंकची वादातून सुरा भोसकून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच आरोपी रोशन सुवर्णाला पनवेल रेल्वेस्थानकातून अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी सुमारे ४०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मयंकवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आरोपीने ऑनलाइन मागवल्याचे तपासात उघड झाले आहे.
गोरेगाव येथील नेस्को ड्रग्जकांडाच्या तपासात कार्यक्रमस्थळ, पार्किंग आणि प्रवेशद्वारांवरील सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांची ये-जा, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आणि हालचालींचा तपशील मिळाला. त्यासोबत मोबाईल लोकेशन, व्हॉट्सॲप चॅट्स आणि डिजिटल पुरावे जोडून तपास अधिक भक्कम करण्यात आला.
मलबार हिल परिसरातील एका महिलेच्या हत्या आणि चोरीच्या प्रकरणातही आरोपी घटनास्थळावरून बाहेर पडताना विविध कॅमेऱ्यांत कैद झाला होता. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीपर्यंत पोहोचून गुन्ह्याची उकल केली.
दहिसरमधील मारहाणीच्या घटनेतही व्हिडिओ फुटेजमुळे आठ आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. अशा अनेक घरफोडी, साखळी चोरी, वाहनचोरी आणि लुटीच्या प्रकरणांतही सीसीटीव्ही फुटेज निर्णायक ठरले आहे.
सीसीटीव्हीमुळे तपासात झालेले फायदे
आरोपींच्या हालचालींचा अचूक मागोवा.
घटनाक्रमाची वेळ आणि क्रम स्पष्ट होतो.
वाहन क्रमांक व पलायनाचा मार्ग शोधणे सोपे.
न्यायालयात डिजिटल पुरावा म्हणून उपयोग.
एआय तंत्रज्ञानामुळे संशयितांची जलद ओळख.
घरफोडी, चोरी, लूट आणि खुनाच्या तपासात मोठी मदत.
मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे
गेटवे ऑफ इंडिया
ताज महाल पॅलेस परिसर
नरिमन पॉइंट
मरीन ड्राइव्ह
काला घोडा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
दादर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, घाटकोपर रेल्वे स्थानके
मुंबई विमानतळ परिसर
मंत्रालय, उच्च न्यायालय,
पोलीस मुख्यालय
सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, महालक्ष्मी मंदिर
क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार, भेंडी बाजार
बीकेसी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स
प्रमुख उड्डाणपूल, सागरी किनारे आणि वाहतूक चौक