मुंबई: गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने गारगाईपेक्षा जवळपास दुप्पट पाणी मिळणाऱ्या पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पाला सत्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २०२७-२८ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात तब्बल ८६५ दशलक्ष लिटरने वाढ होणार आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता २०४१ पर्यंत ६,४२४ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पाला चालना द्यावी लागणार आहे. अलीकडेच गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ झाल्यामुळे २०३० पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सुमारे ४५५ दशलक्ष लिटरने वाढ होणार आहे.
त्यामुळे शहराला दररोज ४,५५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील पाणीटंचाई टाळण्यासाठी दहा वर्षात सुमारे २ हजार दशलक्ष लिटर्स पाणी आणण्यासाठी नवीन पाणीपुरवठा प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहेत.
यातील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. पण मुंबई महानगरपालिकेने पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतल्यास ८६५ दशलक्ष लिटर पाण्यामध्ये वाढ होणार आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्पचा शुभारंभ झाल्यास २०३५ पूर्वी मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये १७०० ते १७५० दशलक्ष लिटर वाढ होणार आहे.
सध्या पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी
सुमारे १४ हजार ३९० कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. पण हा प्रकल्प लांबल्यास हा खर्च १० ते २० टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात या प्रकल्पाला चालना देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे.
अशी होणार पाणीपुरवठ्यात वाढ
गारगाई : ४५५ दशलक्ष लिटर
पिंजाळ : ८६५ दशलक्ष लिटर
पिंजाळ दमणगंगा नदीजोड प्रकल्प : १,५८६ दशलक्ष लिटर
खारे पाणी गोडे करणे : ४०० दशलक्ष लीटर
दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा
मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने शिफारस केल्यानुसार दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातून १ हजार ५८६ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.
जव्हारमध्ये प्रकल्प साकारणार
पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प जव्हार तालुक्यामधील खिडसे गावानजीक विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आली आहेत. या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रांमुळे बाधित होणार्या खाजगी व शासकीय जमिनी संपादन करण्यात येणार आहेत. विकास नियोजन आराखड्यांतर्गत आरक्षित असलेले भूखंड खरेदी करण्याबाबतच्या सुचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.