Mumbai Crime News
मुंबई: दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टर तरूणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना मुंबईत घडली आहे. डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (वय २४) असे तिचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, दिल्लीत प्रियकराने ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणासारखे 'तूही एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील' अशी धमकी तिचा प्रियकर द्यायचा.
याप्रकरणी मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकर फजल मोहम्मद खान (वय ३१) याला लोअर परळ येथून अटक केली आहे. त्याला कुर्ला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फजल खान हा विमा एजेंट म्हणून का करतो. त्याची डॉ. स्तुती सोनावणे हिच्यासोबत एका डेटिंग अॅपवरून ओळख झाली होती. गेल्या एक वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. याबाबत स्तुतीने आपल्या मैत्रिणीला सांगितले होते.
८ मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील बाहेर गेले असता तिने गळफास घेऊन जीवन संपवले. आई-वडिल घरी परतल्यानंतर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये डॉ. स्तुतीने फैजल खान हा मानसिक छळ करत असल्याचा उल्लेक आहे. या छळाची माहिती तिने आपल्या मैत्रिणीला देखील दिली होती. अनेकवेळा फजल स्तूतीला 'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील' म्हणायचा, असे तिने मैत्रिणीला सांगितले होते. मंगळवारी पोलिसांनी प्रियकर खान याला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.