मुंबई: केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांहून अधिक रकमेच्या 'पर्सन टू मर्चट' (पीटूएम) यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर ( मर्चट डिस्काउंट रेट) लागू करण्याच्या निर्णया विरोधात मुंबईतील सर्व पेट्रोल पंपांवर यूपीआय पेमेंट बंद पुढील आठवड्यापासून बंद होईल. पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष चेतन मोदी यांनीच तसे संकेत दिले.
काहीही झाले तरी २ हजार रूपयांपेक्षा जास्त यूपीआय व्यवहार न करण्यावर पेट्रोलपंप चालक ठाम आहेत. येत्या आठवड्याभरात संघटनेच्या फेडरेशनची संयुक्त बैठक ठाणे आणि मुंबईत होणार आहे. त्यानंतर तशी घोषणा केली जाईल,असे चेतन मोदी यांनी सांगितले.
यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर ( मर्चट डिस्काउंट रेट) चा भुर्दंड नको म्हणून मुंबईतील सर्व पेट्रोल पंप चालक एकवटले आहेत. मुंबईत लहानमोठे २३७ पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी १५० पेट्रोलपंप पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अधिकृत सदस्य आहेत.
शिवाय ठाणे,नवीमुंबई येथेही फेडरेशनचे पेट्रोलपंप चालकही सदस्य आहेत. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या पेट्रोलपंपापाचे चालक संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन हजार रुपयांपुढील यूपीआय पेमेंट बंद करण्याची तयारी मुंबईत जवळपास झालेली आहे.
दरम्यान, पेट्रोल पंपांवर अचानक यूपीआय ऑनलाईन पेमेंट घेणे बंद झाल्यास त्याचा मोठा फटका मुंबईतील वाहनधारकांना बसणार आहे. याबाबत समाजातील विविध स्तरांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काहीजण या निर्णयामुळे रोख रक्कमेचा अधिक वापर करून तसेच व्यवसायातील प्राप्ती कमी दाखवून या नवीन करातून पळवाटा शोधतील.
परिणामी यूपीआयचा किंवा एमडीआरचा अतिरिक्त बोजा अखेरीस ग्राहकांवरच लादला जाईल, अशी भीती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष, विरेन शाह यांनी व्यक्त केली.
एका अंदाजानुसार पंपावरील दोन हजारांपुढील एका व्यवहाराला पाच रुपये सरासरी एमडीआर मोजावा लागेल.
दुसरीकडे सोशल मीडियावर वाहनधारकांनी 'सरकारने विश्वासघात केला' अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.