bulldozer action 
मुंबई

BMC bulldozer action Mumbai : मानखुर्दमध्ये गोडाऊन, गाळे व हॉटेलसह ४६ अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा बुलडोझर

प्रशासनाने एका झटक्यात घाव घातल्याने अतिक्रमण कर्त्यांमध्ये खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मानखुर्द परिसरातील टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिनीखाली शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे उभारण्यात आले. यामधील गोडाऊन, व्यावसायिक गाळे, हॉटेल आणि इतर अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी अखेर प्रशासनाचा बुलडोझर फिरला.

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या संयुक्त धडक कारवाईत तब्बल ४६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून शासकीय जागा बळकावून सुरू असलेल्या व्यावसायिक साम्राज्यावर प्रशासनाने एका झटक्यात घाव घातल्याने अतिक्रमणकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

सायन - पनवेल मुख्य महामार्गालगत ट्रॉम्बे वाहतूक चौकीच्या समोरील टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिनीखालील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात गोडाऊन, गाळे, हॉटेल आणि अन्य व्यावसायिक बांधकामे उभारून सर्रास व्यवसाय सुरू होता. जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या बांधकामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असतानाच जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी कठोर भूमिका घेत संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण), उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण), उपविभागीय अधिकारी, कुर्ला विभाग, तहसीलदार, कुर्ला, महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या कडेकोट बंदोबस्तात जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. काही तास चाललेल्या या मोहिमेत एकामागोमाग एक गोडाऊन, गाळे, हॉटेल आणि इतर अनधिकृत संरचना पाडण्यात आल्या. कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे. शासकीय जमिनीचे संरक्षण, धोकादायक व बेकायदा बांधकामांवर आळा आणि अतिक्रमणमुक्तीची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मानखुर्दमधील या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरात दिवसभर या कारवाईचीच चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT