Kurla crane collapse 
मुंबई

Kurla crane collapse: कुर्ल्यात इमारतीच्या तोडकामावेळी मोठा अपघात; झोपड्यांवर क्रेन कोसळून १० जण जखमी

घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कुर्ला पूर्व परिसरात शुक्रवारी पहाटे एमएमआरडीएकडून जुन्या इमारतीचे तोडकाम सुरू असताना एक मोठे क्रेन चार ते पाच झोपड्यांवर कोसळला. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्ला कुरेशी नगर येथील इंदीरा नगर परिसरात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या परिसरात एमएमआरडीएची एक जुनी इमारत आहे. ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) एमएमआरडीएकडून याठिकाणी तोडक कारवाई सुरू होती. मात्र इमारतीच्या वरचा भाग जेसीबीमशीन मार्फतच तोडला जाणार असल्याने याठिकाणी एक जेसीबी मागवण्यात आला. या जेसीबीला इमारतीच्यावर घेऊन जाण्यासाठी एक मोठे क्रेन देखील आणण्यात आले. रात्री बारा वाजल्यापासून याठिकाणी जेसेबी इमारतीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

मात्र पहाटे तीनच्या सुमारास जेसेबी इमारतीवर घेऊन जात असताना अचानक संतुलन बिघडल्याने क्रेन बाजूला असलेल्या चार ते पाच झोपड्यांवर कोसळले. यावेळी या झोपड्यांमध्ये अनेकजण झोपलेले होते. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेतली. झोपड्यांवर क्रेन कोसळल्याने अनेकजण याठिकाणी अडकले होते.

घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत सायन आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. राजू गौड (३५) आरती गौड (३०), जगरुल्ला खान (६३), अहमद नियाज (३ महिने), अतिकुर रहमान (६३), नुमान खान (२१),हकुम शेख (३६), रहमान खान (१९), सूरज गौरी (१०) आणि अकबर (४०) अशी या जखमींची नावे असून सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT