Mumbai Police News: मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपद अवघ्या दोन वर्षांत इतिहासजमा!

२०२३ मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे पहिले विशेष पोलीस आयुक्त ठरले देवेन भारती , २०२५ मध्ये मात्र गुप्तवार्तेसाठी नवी रचना
Police
PolicePudhari
Published on
Updated on

महेश पांचाळ

मुंबई: मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ प्रशासकीय रचनेत २०२३ मध्ये निर्माण करण्यात आलेले विशेष पोलीस आयुक्तपद अवघ्या दोन वर्षांत इतिहासजमा झाले आहे. या पदावर पहिले अधिकारी म्हणून देवेन भारती यांनी जबाबदारी स्वीकारली होती.

मात्र, भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन विशेष आयुक्त नेमण्याऐवजी राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता यंत्रणेची पुनर्रचना केली. त्यातून पोलीस सहआयुक्त (गुप्तवार्ता) हे स्वतंत्र पद निर्माण झाले.

महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार, ४ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णय क्रमांक IPS-2022/CR-437/Pol-1 अन्वये बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आले. त्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी देवेन भारती यांनी या पदाचा पदभार स्वीकारला.

भारतींच्या नियुक्तीने नव्या पदाची सुरुवात

विशेष पोलीस आयुक्त हे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ व्यवस्थेतील स्वतंत्र पद होते. विविध शाखांमध्ये समन्वय, वरिष्ठ पातळीवरील देखरेख आणि पोलीस आयुक्तांना प्रशासकीय सहाय्य अशी या पदाची प्रमुख जबाबदारी होती.

Police
Contractors Pending Bills: सरकारकडे थकले ८६ हजार ६२२ कोटी; राज्य शासकीय कंत्राटदार फेडरशेनचे उद्यापासून आझाद मैदानात आंदोलन

देवेन भारती यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि कायदा-सुव्यवस्था विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यामुळे त्यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती महत्त्वाची मानली गेली.

भारती आयुक्त झाले अन् रचना बदलली

विशेष पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी नवीन विशेष आयुक्त नेमण्याऐवजी राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला.

Police
Unauthorized Schools in Mumbai: महामुंबईत पूर्वपरवानगीशिवाय शाळांचा उच्छाद; सर्वाधिक अनधिकृत शाळा महानगरपालिका क्षेत्रात

१६ मे २०२५ रोजी डॉ. आरती सिंह यांची मुंबईच्या पहिल्या पोलीस सहआयुक्त (गुप्तवार्ता) म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नव्या व्यवस्थेमुळे मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रचनेत गुप्तवार्ता विभागाला स्वतंत्र नेतृत्व मिळाले.

डॉ. आरती सिंह यांनी १९ मे २०२५ रोजी या पदाचा पदभार स्वीकारला असून सध्या त्या याच पदावर कार्यरत आहेत. गुप्तवार्ता संकलन, संभाव्य सुरक्षा धोके, दहशतवादी कारवायांशी संबंधित माहिती तसेच संवेदनशील घडामोडींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे.

विशेष पोलीस आयुक्ताऐवजी आता गुप्तवार्तेला स्वतंत्र नेतृत्व

या प्रशासकीय बदलामुळे २०२३ मध्ये निर्माण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे विशेष पोलीस आयुक्तपद पुढे कायम राहिले नाही. त्याऐवजी गुप्तवार्ता विभागासाठी सहआयुक्तपदाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ प्रशासकीय रचनेतील विशेष आयुक्तपदाचा प्रवास अवघ्या दोन वर्षांत संपुष्टात आला.

विशेष म्हणजे, हा बदल केवळ रिक्त पदावर नवीन अधिकारी नियुक्त करण्यापुरता मर्यादित राहिला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून गुप्तवार्ता यंत्रणेला स्वतंत्र नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबई पोलिसांच्या प्रशासकीय रचनेतही नवा बदल पाहायला मिळाला आहे.

विशेष आयुक्तपदाचा दोन वर्षांचा प्रवास

४ जानेवारी २०२३: बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण.

५ जानेवारी २०२३: देवेन भारती यांनी पहिले विशेष पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

३० एप्रिल २०२५: देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती.

१६ मे २०२५: डॉ. आरती सिंह यांची मुंबईच्या पहिल्या पोलीस सहआयुक्त (गुप्तवार्ता) म्हणून नियुक्ती.

१९ मे २०२५: डॉ. आरती सिंह यांनी सहआयुक्त (गुप्तवार्ता) पदाचा पदभार स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news