Mumbai news
मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये २०२२ मध्ये मृत्यू झालेल्या एका ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी चक्क एका क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरक्षित जपून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता मृतदेह अमेरिकेतील एका 'क्रायोनिक्स' केंद्रात नेऊन अतिथंड तापमानात दीर्घकाळ जतन करायचा, असा कुटुंबियांचा अजब प्लॅन होता. या घटनेमुळे मुंबई पोलीस अवाक झाले आहेत. मृतदेह अशा प्रकारे जतन करण्याच्या कायदेशीर बाबी आणि त्याला परवानगी असल्यास त्या कालावधीबाबत पोलीस आता तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
कुरार पोलिसांना सोमवारी रात्री एका गुप्त खबऱ्यामार्फत या प्रकाराची कुणकुण लागली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने मालाडमधील एका बंद असलेल्या पॉलीक्लिनिकवर छापा टाकला. हे क्लिनिक गेल्या महिनाभरापासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद होते. पोलिसांनी तपास केला असता, क्लिनिकमधील एका फ्रीजरमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळून आला.
पोलिसांनी मृताच्या वृद्ध पत्नी आणि प्रौढ मुलांकडे चौकशी केली असता, त्यांनी २०२२ मध्येच नैसर्गिक कारणांमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचे कागदपत्रे दाखवून स्पष्ट केले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याचे मार्ग शोधले.
या शोधादरम्यान त्यांना अमेरिकेतील काही संस्थांबद्दल माहिती मिळाली, ज्या 'क्रायोनिक्स' सेवा पुरवतात. या तंत्रज्ञानानुसार कायदेशीररीत्या मृत घोषित केलेल्या व्यक्तींचे शरीर अत्यंत कमी तापमानावर (लिक्विड नायट्रोजनमध्ये) गोठवून ठेवले जाते. पेशी आणि उतींचे जतन वैद्यकीय क्षेत्रात मान्य असले, तरी संपूर्ण शरीराचे 'क्रायोनिक्स' करणे हे अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या प्रायोगिक मानले जाते.
कुटुंबियांनी अमेरिकेतील अशा एका संस्थेशी मृतदेह तिकडे नेण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला होता. तसेच भारतात कायदेशीर प्रक्रियेबदलही काही वकिलांचा सल्ला घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मृतदेह मालाडच्या क्लिनिकमध्येच ठेवण्यात आला; मात्र याची कोणतीही कल्पना स्थानिक पोलीस किंवा क्लिनिकच्या व्यवस्थापनाला देण्यात आली नव्हती. ज्या मालकाने हे ठिकाण क्लिनिकसाठी भाड्याने दिले होते, त्यालाही या प्रकाराची कोणतीही माहिती नव्हती.
मंगळवारी पोलिसांनी कुटुंबियांचे, क्लिनिक व्यवस्थापनाचे आणि जागेच्या मालकाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सध्या पोलिसांनी क्लिनिकबाहेर बंदोबस्त तैनात केला असून, मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशा प्रकारे मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याच्या कायदेशीर वैधतेबाबत पोलीस कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.