Mumbai AC Local Train : दररोज गर्दीचा सामना करत प्रवास करणाऱ्या मुंबईतील लाखो चाकरमान्यांसाठी अत्यंत आनंददायी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. मुंबई लोकलच्या ताफ्यात लवकरच नव्या वातानुकूलित (AC) गाड्या दाखल होणार असून, पुढील वर्षापासूनच (२०२७) या एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे २३८ नव्या एसी लोकल गाड्यांची मागणी केली होती. केंद्र सरकारने या मागणीला मंजुरी दिली असून, सुरुवातीच्या नियोजनानुसार या गाड्या पूर्णपणे सेवेत येण्यासाठी २०३० सालापर्यंत वाट पाहावी लागणार होती. मात्र, चाकरमान्यांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने हा कालावधी कमी केला आहे. आता तब्बल तीन वर्षे आधी, म्हणजेच २०२७ पासूनच या गाड्या मुंबईच्या रेल्वे मार्गांवर धावण्यास सुरुवात होईल. त्यामुळे एसी लोकलसाठी मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
मुंबईकरांसाठीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मुंबईकरांच्या हितरक्षणासाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.