Water Taxi Launch
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच मुंबई ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सीने जोडण्याचे संकेत दिल्यानंतर सोमवारी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठक घेत यावर शिक्कामोर्तब केले. बंदरे विभागाने या सेवेबाबत नियोजन करावे, असे निर्देश राणे यांनी दिले आहेत. यामुळे मुंबई व नवी मुंबई ही दोन शहरे अवघ्या 40 मिनिटांत जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत.
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनलची उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्याची ठिकाणे निश्चित करण्याबरोबरच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचनाही बंदरे विभाागाला केल्या आहेत.
ही बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या सेवेमुळे काय होणार ?
वॉटर टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडले जाऊन प्रवासाचाही वेळ वाचणार आहे.
वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होत पर्यावरणाला फायदा होईल.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल
अटल सेतूनंतर मुंबई - नवी मुंबई जोडणारी ही महत्त्वाची सेवा ठरणाार आहे.