मुंबई : नेव्हल डॉक येथे दशहतवादी हल्ला होणार असल्याच्या निनावी कॉलने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर ती धमकी बोगस असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी जहांगीर शेख नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
शनिवारी (दि.15) रात्री साडेआठ वाजता मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जहांगीर शेख नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो आंध्र प्रदेश येथे राहात असून नेव्हल डॉक येथे दहशतवादी हल्ला होणार आहे. सतर्क रहा, असे बोलून कॉल कट केला होता. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने ही माहिती वरिष्ठांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीने त्याचा मोबाईल बंद केला होता. या घटनेनंतर नेव्हल डॉक परिसरात पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकांसह श्वान पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली होती, मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची ती माहिती बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित जहांगीर शेख याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ला होणार असल्याची बोगस माहिती देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करत आहेत.