मुंबई (पुढारी वृत्तसेवा): अरुंद गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. यात दक्षिण मुंबईतील ५०० पेक्षा जास्त गल्ल्यांचा समावेश असून, यात कुलाबा, फोर्ट, काळबादेवी, भुलेश्वर, गिरगाव आणि मलबार हिल या परिसरातील शेकडो ऐतिहासिक आणि व्यापारी गल्ल्यांचा समावेश आहे. झवेरी बाजार, खाऊ गल्ली, फणसवाडी गल्ली, कोतवाल चाल गल्ली, वेलकर स्ट्रीट, देऊळवाडी, चंदनवाडी आदी प्रमुख गल्ल्यांमधून या कारवाईचा शुभारंभ करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष अतिक्रमण निर्मूलन पथक नेमण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईतील पालिकेच्या चंदनवाडी सी-विभाग कार्यालयांतर्गत मोठ्या प्रमाणावर अरुंद गल्ल्या येतात. तसेच मुंबई सेंट्रल, ग्रँटरोड, नागपाडा, पायधुनी, मोहम्मद अली रोड आदी भागातही गल्ल्यांची संख्या मोठी असून, येथे कपडे, सोने-चांदी घडवण्याचे कारखाने व विविध व्यवसाय चालतात.
या व्यावसायिक व परिसरातील प्रचंड वर्दळीमुळे गल्ल्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह इतर वस्तू विक्रेत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गल्ल्यांच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे वाढल्याने एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल व रुग्णवाहिकेस वेळेत पोहोचण्यास अडथळा निर्माण होत होता. याबाबत अग्निशमन दलाकडूनही आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, ज्याची गंभीर दखल घेत पालिकेने हे पाऊल उचलले आहे.
सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी
गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटवण्यासाठी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांवर मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरक्षाक्षक व पोलिसांचा समावेश असलेले अतिक्रमण निर्मूलन पथक तयार केले जाणार असून, लवकरच कारवाईचा तातडीने तयार करून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल.
फेरीवाल्यांवर आणि अवैध व्यवसायांवर दंडात्मक कारवाई
गल्ल्यांमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांना पालिकेने क्यूआर कोड आधारित ओळखपत्र दिले असून, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून हटवले जाणार आहे. मात्र, अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. कारवाईनंतर पुन्हा व्यवसाय केल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्यासोबतच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पार्किंगबाबत नवीन नियमावली
गल्ल्यांच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळेही मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पार्किंगवरही कठोर बंधने आणली जाणार असून, विषम आणि सम (Odd-Even) तारखेनुसार वाहने उभी करण्याची नवी नियमावली तयार केली जात आहे. तसेच नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले जाणार आहेत.