MBBS Fees Pudhari
मुंबई

MBBS students fee surcharge : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांवर पठाणी दंड

पालिकेच्या सावकारीपणामुळे डॉक्टरांचे भवितव्य अंधारात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय व बा. य. ल नायर हॉस्पीटल येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांनी वेळेत शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून त्यांच्यावर पठाणी दंड लावण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या सावकारी भूमिकेमुळे कर्जबाजारी होऊन, डॉक्टर बनलेल्या युवकांचे भवितव्य अंधारात आहे.

नायर हॉस्पिटलच्या वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेऊन एमबीबीएस डॉक्टर बनलेल्या युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एमबीबीएस शिक्षण पूर्ण झालेल्या एका विद्यार्थ्यांने 3 लाख 43 हजार 100 रुपये शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क न भरल्यामुळे 19 लाख 45 लाख 699 दंडासह सुमारे 22 लाख 81 हजार 699 रुपये भरण्याचे नोटीस काढण्यात आली आहे. परंतु एवढे पैसे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्यासारख्या गरीब कुटुंबाने आणायचे कुठून, असा सवाल विद्यार्थ्यांने केला आहे. दंडासह शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये इंटर्नशिप पूर्ण करूनही त्यांना इंटर्नशिप पूर्णत्वाचा दाखला (आयसीसी) मिळालेला नाही. यात अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मूळ शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत दंडाची रक्कम प्रचंड जास्त असून काही प्रकरणांमध्ये ती लाखो रुपयांच्या घरात पोहचली आहे. हा दंड आकारताना महापालिकेने ज्या परिपत्रकाचा आधार घेतला, ते प्रत्यक्षात कीटकनाशके व कंत्राटदार सेवांच्या दरांसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कास लागू होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता दंड आकारणीसाठी 1990 च्या परिपत्रकाचा दाखला देण्यात आला आहे. त्या परिपत्रकानुसार प्रति दिवस एक रुपया इतकी दंड आकारणी नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अनेक पटीने जास्त दंड आकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह आरोग्य समिती अध्यक्षांकडे केली आहे.

डॉक्टर होऊनही दोन वर्षांपासून काम नाही!

आयसीसी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना डॉक्टर होऊनही कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून नुकसान झाले आहे. मुंबई महापालिकेच्या सावकारीपनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT