Marathi school closure: नाना शंकरशेट यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक मराठी शाळेवर बंदीचे सावट; 178 वर्षांचा वारसा धोक्यात

गिरगावच्या ‌‘एसएल ॲण्ड एसएस‌’ शाळांसमोर अस्तित्वाचा संघर्ष !
Girgaon School
Girgaon SchoolPudhari
Published on
Updated on

पवन होन्याळकर

मुंबई: गिरगावातील दादाभाई नौरोजी रोडवर उभी असलेली तब्बल 178 वर्षांची ‌‘एसएल ॲण्ड एसएस शाळा‌’ आज प्रशासकीय अवकृपेने बंद पडण्याच्या बेतात आहे. जगन्नाथ शंकरशेट यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घालत सुरू केलेली ही ऐतिहासिक मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी म्हणजेच पटसंख्येच्या निकषावर बंद करण्याचीच भाषा शिक्षण खात्याने चालवली असून, मुंबईत स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी ही ऐतिहासिक मराठी शाळा वाचवण्यासाठी कोण पुढे येणार, असा प्रश्न आहे.

मराठमोळ्या गिरगावातील चिराबाजारमध्ये दादाभाई नौरोजी स्ट्रीटवर या शाळेची तीन मजली इमारत उभी आहे. याच शाळेच्या भल्या मोठ्या वर्गखोल्यांतून आजवर हजारो मुलींना शिक्षणाचे बळ मिळाले. 1818 च्या सुमारास पेशवाई संपली आणि इंग्रजांचा अंमल सुरू झाला. याच दरम्यान सनातन्यांच्या समाजाच्या प्रखर विरोधाला न जुमानता नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी आपल्या घराच्याच अंगणात मुलींची पहिली मराठी शाळा सुरू केली. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे गुन्हा मानले जात होते, त्या काळात नानांनी स्वतःच्या मुलींनाही याच शाळेत पाठवून समाजाला दिशा दिली.

Girgaon School
Bank Account Freeze Law: बँक खात्यांची बेकायदा जप्ती पूर्णत: चुकीची

डॉ.दादाभाई नौरोजी, रावबहादूर नारायण दिनानाथ वेलकर, डॉ.भाऊ दाजी लाड, न्या. तेलंग, रावसाहेब मंडलिक यांसारख्या दिग्गजांच्या सहकार्याने ‌‘स्टुडंट्स लिटररी ॲण्ड सायंटिफिक सोसायटी‌’ची 13 जून 1848 ला स्थापना झाली आणि मुंबईत प्रथमच स्त्रीशिक्षणाची चळवळ आकाराला आली ती याच शाळेत! याच संस्थेच्या शाळा पुढे ‌‘एसएल ॲण्ड एसएस सोसायटीचे हायस्कूल‌’ आणि ‌‘जगन्नाथ शंकरशेट मराठी शाळा‌’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

मुलींची शाळा म्हणून कित्येक वर्षे ही शाळा ओळखली गेली. अलीकडे मुलींची संख्या कमी झाली आणि सहशिक्षणाला मान्यता घेत मुलांनाही तिथे प्रवेश दिला जाऊ लागला. तरीही पटसंख्या घटत गेली आणि अनुदान बंद करण्याची धमकी देणारे फोन शिक्षण खात्यातून सुरू झाले.

पटसंख्या का घटली?

2025-2026 मध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत अवघे 68 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. त्यात 31 मुले आणि 37 मुली. त्यातील अनेकजण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, त्यांच्यासाठी ही शाळा महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्गात दहापंधरा विद्यार्थ्यांपेक्षाही कमी संख्या आहे. एकेकाळी याच शाळेत शेकडो नव्हे, तर हजारो विद्यार्थ्यांचा गजबजाट असायचा, वर्गखोल्यांमध्ये बसायला जागा अपुरी पडायची; पण आज परिस्थिती इतकी बदलली आहे की, मोठ्या वर्गखोल्या विरळ विद्यार्थी संख्येमुळे ओसाड वाटू लागल्या आहेत.

नाना शंकरशेट यांच्या नावाने असलेल्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात 12 मुले आणि 16 मुली आहेत. प्रत्येक वर्गात दोन ते सहा विद्यार्थ्यांपर्यंतच संख्या मर्यादित आहे.

Girgaon School
Maharashtra PNG Gas Network: एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा; राज्य सरकार ‌‘पाईप गॅस‌’चे जाळे विस्तारणार

एकेकाळी याच प्राथमिक विभागात शिक्षणाची पहिली पायरी चढण्यासाठी पालकांची रांग लागत असे, वर्गखोल्या लहान पडत आणि शिक्षकांना अतिरिक्त तुकड्या होत्या. पण आज त्याच वर्गांमध्ये मोजकेच विद्यार्थी बसलेले दिसतात. या 28 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश मुले अत्यंत सामान्य किंवा गरीब कुटुंबातील असून त्यामुळे हा प्राथमिक विभाग टिकणे गरजेचे आहे, असे विश्वस्त प्रकाश चिखलीकर यांनी पुढारीला सांगितले.

आज या शाळेत येणारी अनेक मुले ही रस्त्यावरची, स्थलांतरित कुटुंबांतील किंवा हलाखीच्या परिस्थितीतून आलेली आहेत. अशा मुलांना शोधून, समजावून आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शिक्षक व शाळा सातत्याने करत आहे.

मात्र त्यांच्याकडे जन्मदाखले नाहीत, आधारकार्ड अपूर्ण किंवा जुळत नाहीत, कागदपत्रांची पूर्तता नाही. परिणामी, ही मुले शाळेत असूनही अधिकृत नोंदीत सामावली जात नाहीत. त्याचा थेट परिणाम पटसंख्येवर दिसतो. इंग्रजीकडे वाढलेला कल, स्थानिक मराठी कुटुंबांचे स्थलांतर आणि मराठी शाळांचे कमी झालेले आकर्षण यामुळेही पटसंख्या कमी होत असल्याचे शिक्षक सांगतात.

आज या शाळेत अवघे 100 विद्यार्थी आणि सात शिक्षक उरले आहेत. इंग्रजी माध्यम, आंतरराष्ट्रीय बोर्ड, स्थलांतर या लाटेत मराठी शाळांची पटसंख्या घटत गेली आणि आज ही ऐतिहासिक शाळा ‌‘ विद्यार्थी संख्येच्या निकषावर‌’ टिकणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news