Mumbai School Pudhari
मुंबई

Mumbai School: मुंबई पालिकेचा शालेय वस्‍तूवाटपाचा दिखावा; पहिला दिवस जुन्‍या गणवेशात

२७ वस्तूंपासून पालिका शाळांतील विद्यार्थी वंचित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सोमवारी मुंबई महानगरपालिकेने ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला. मात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शैक्षणिक वस्तूंच्या वितरणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कूल वगळता महानगरपालिकेच्या इतर कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर वस्तूंचे वाटप झालेले नाही. राज्‍यपालांच्‍या हस्‍ते मुंबई पब्लिक स्कूलमध्‍ये केवळ दिखावा केल्‍याचे उघडकीस आले आहे.

मुंबई महापालिका शाळांत ३ लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्‍यांना दरवर्षी पाठ्यपुस्तकांसह दोन गणवेश, बूट, मोजे, दप्तर, वह्या, पाण्याची बाटली, डबा, पीटी गणवेश, रेनकोट किंवा छत्री, कंपास बॉक्स, लेखनसाहित्य, चित्रकलेचे साहित्य तसेच मुलींसाठी रिबीन, हेअरबँड आणि सॅनिटरी नॅपकिन अशा एकूण २७ वस्तूंचे वितरण केले जाते. सामान्यतः शाळेच्या पहिल्याच दिवशी या वस्तू विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असतो.

यंदा मात्र राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भायखळ्यातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमात निवडक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह २७ वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मात्र, या शाळेशिवाय इतर कोणत्याही महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांना या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे नगरसेवक सचिन पडवळ यांनी प्रशासनाने राज्यपालांसमोर केवळ नमुन्यांच्या स्वरूपातील साहित्य वितरित करून वास्तविक परिस्थिती लपविल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांनीही सर्व शाळांमध्ये साहित्य वितरणाची स्थिती जाणून घेणे अपेक्षित होते, असे त्यांनी म्हटले.

जुलै अखेरपर्यंत होणार वाटप

दरम्यान, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ वस्तूंची खरेदी यंदा ‘जेम’ पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. संबंधित प्रस्तावांना ३ जूनपर्यंत मंजुरी मिळाल्याची माहिती शिक्षण समिती सदस्य अंजली नाईक यांनी दिली. जुलैअखेरपर्यंत महानगरपालिकेच्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT