एमआरआय, सिटीस्कॅन सेवेचेही कंत्राटीकरण! pudhari photo
मुंबई

BMC Hospitals : एमआरआय, सिटीस्कॅन सेवेचेही कंत्राटीकरण!

पालिका किरकोळ भाड्यात हॉस्पिटलमध्ये जागा देणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्‍या रुग्‍णालयांत डायलिसीस केंद्रांसाठी खासगी संस्थांना जागा देण्‍यात आल्‍यानंतर आता एमआरआय, सिटीस्कॅन सेवेचेही कंत्राटीकरण होणार आहे. यासाठी महापालिका काही संस्थांसाठी किरकोळ भाड्यात हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे गोरगरीब रुग्णांच्या उपचारांमध्ये विलंब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रस्‍तावला महापालिकेच्या सुधार समितीमध्ये मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून याला महापालिका सभागृहाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर हॉस्पिटलमधील जागा संस्थांना बहाल करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आरोग्‍य सेवेचे खासगीकरण होणार नाही असा शब्‍द देत असली तरी एक एक निर्णय त्‍याच दिशेने घेत आहेत. पालिका रुग्‍णालयांत डॉक्टर, नर्सेस व अन्य टेक्निकल कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात येत आहे. यातून बोगस डॉक्‍टर भरतीचा प्रकार उघडकीस आला असतानाही अलीकडेच डायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठी काही हॉस्पिटलमधील जागा संस्थांना देण्यात आली.

आता एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना ही सेवा सुविधा वेळेत उपलब्ध होणार नाही. खासगी संस्थांच्या ताब्यात एमआरआय सिटी स्कॅन सेवा असल्यामुळे संस्थांमार्फत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संस्थांना देणार जागा

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथील पहिल्या मजल्यावरील १४८.६४ चौ. मी आणि १३९.३५ चौ. मी इतक्या क्षेत्रफळाची जागा क्रस्ना डायग्नोस्टिक्स संस्थेस प्रतिवर्ष १,९९,९९९ भाडे.

  • के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे येथील तळमजल्यावरील १७६.७२ चौ. मी. आणि १६०.३४ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा क्रस्ना डायग्नोस्टिक्स संस्थेस ६ लाख प्रति वर्ष भाडे.

  • हरीलाल भगवती रुग्णालय, बोरीवली येथील तळमजल्यावरील २७२.३२ चौ. मी. आणि २५९.६८ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा पल्स हायटेक हेल्थ संस्थेस ७ लाख ९५ हजार प्रति वर्ष भाडे.

  • अगरवाल रुग्णालय, मुलुंड येथील तळमजल्यावरील १९१.८० चौ. मी. आणि १९२.९८ चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाची जागा रुबी ऐल केअर संस्थेस ६ लाख ११ हजार प्रति वर्ष भाडे.

हॉस्पिटलमध्ये बसा, डीन यांना निर्देश

महापालिका सभागृहासह स्थायी समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकांना हॉस्पिटलच्या अधिष्ठाता (डीन) यांना हजर राहण्‍याच्‍या बंधनातून मुक्‍त केले आहे. त्‍यांना आपआपल्‍या रुग्‍णालयात रुग्‍णसेवेसाठी उपलब्‍ध राहण्‍याचे निर्देश दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेबद्दल काही तक्रारी असतील तर संबंधितांना डीनला त्यांच्या कार्यालयात भेटता येणार आहे.

बोगस डॉक्‍टर भरती उघडकीस

महापालिकेच्या रूग्णालयांत कंत्राटाद्वारे डाॅक्टरांची भरती केली जात आहे. यातून व्ही.एन. देसाई रूग्णालयात एक बोगस डाॅक्टर भरती केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आवश्यक ती अर्हता नसनानासुद्धा कंत्राटदाराकडून बोगस डॉक्टारांची भरती केली जात असल्‍याने मंगळवारी झालेल्‍या स्‍थायी समितीत सदस्‍यांनी तीव्र ताशेरे ओढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT