मुंबई: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा कारभार आता पूर्णपणे 'कागदमुक्त' (पेपरलेस) आणि 'हायटेक' करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालिका सभागृह तसेच विविध समित्यांच्या विषयपत्रिका आता 'हार्ड कॉपी' ऐवजी थेट 'पीडीएफ' स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या सर्व २३७ नगरसेवकांना महिनाभरात 'टॅब'चे वाटप केले जाणार असल्याची माहिती तंत्रज्ञान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महापालिकेतील निवडून आलेले २२७ अधिक आणि१० नामनिर्देशित सदस्यांना सभागृहाच्या मासिक सभेतील विषयांचे प्रस्ताव तसेच विविध समित्यांच्या पटलावरील विषयांचे प्रस्ताव देण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवावे लागते.
टॅब दिल्यानंतर हा व्याप कमी होणार आहे. टॅबद्वारे नगरसेवकांना सर्व अहवाल, अन्य माहितीही तत्काळ मिळणार असल्याने त्यांचे कामही वेगाने होणार आहे. त्यामुळेच ॲपल कंपनीचे टॅब खरेदीची प्रक्रिया आयटी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे.
महापालिकेतील २३७ नगरसेवकांना अजेंडा, ठरावाची सूचना, कार्यक्रम पत्रिका देण्यासाठी सचिव विभागातील शिपाई यांना दिवसभर महानगरपालिका मुख्यालयात काम करून पुन्हा रात्री प्रत्येक नगरसेवकांच्या घरापर्यत या जावे लागते.
याकरिता काही वेळा शिफाई यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. यामुळे याचा मनस्ताप शिपाईसह नगरसेवकांनाही सहन करावा लागतो. मात्र आता हे सर्व अजेंडा, कार्यक्रम पत्रिका आणि ठरावाची सूचना टॅबवर ऑनलाईन उपलब्ध झाल्यास सचिव विभागातील कामगारांचा ताण कमी होईल, आणि त्यांना रात्री सुखाची विश्रांती मिळेल.