मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते व विरोधी पक्षनेते या दोन प्रमुख पदांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्ही पदांसाठी चाचपणी सुरू असून, वरिष्ठ नगरसेवकाला ही दोन पदे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्यांच्या अध्यक्षपदापेक्षाही सभागृह नेते व विरोधी पक्षनेते ही दोन पदे महत्त्वाची मानली जातात. सभागृह नेतेपद महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडे जाते, तर विरोधी पक्षात सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाते. या दोन्ही पदांसाठी मुंबई महानगरपालिकेचा अनुभव असलेल्या नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला मिळू शकते, तर सभागृह नेतेपद सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपाच्या वाट्याला जाणार आहे. सभागृह नेते पदासाठी भाजपामध्ये अनेक वरिष्ठ नगरसेवक आहेत.
भाजपामध्ये प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, मकरंद नार्वेकर, राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर वरिष्ठ नगरसेवक आहेत. यापैकी प्रभाकर शिंदे शिवसेनेत असताना सभागृह नेते होते, तर, भाजपामध्ये पक्षाचे गटनेते होते. प्रकाश गंगाधरे, मकरंद नार्वेकर यांना विविध समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु सभागृह चालवण्याचा त्यांना फारसा अनुभव नाही.
विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटामध्ये विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य हे वरिष्ठ नगरसेवक आहेत. यापैकी विशाखा राऊत या अगोदर सभागृह नेत्या होत्या, तर श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य यांनी महापौर पद भूषवले आहे. त्यामुळे यापैकी एकाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.