Mule Bank Accounts Scam Pudhari
मुंबई

Mule Bank Accounts Scam: म्यूल खात्यांच्या रॅकेटमागे राजस्थान कनेक्शनचा संशय; खरातच्या १३, तर भुजबळच्या नावावर ९ खाती

खरातच्या नावावर १३ म्यूल खाती, तर भुजबळच्या नावावर ९ म्यूल खाती असल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या म्यूल बँक खात्यांच्या रॅकेटमागे राजस्थान कनेक्शन असल्याचा संशय खार पोलिसांना आहे. या प्रकरणात अटक केलेला अविनाश खरात आणि आरोपी विकास भुजबळ यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

खरातच्या नावावर १३ म्यूल खाती, तर भुजबळच्या नावावर ९ म्यूल खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळवण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

खरात मूळचा बीडचा

अविनाश खरात (२५) हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या तो पुणे परिसरात राहत असून पुण्याजवळील चाकण येथील फ्लॅटचा पत्ताही त्याच्याशी संबंधित असल्याचे तपासात आढळले.

खरातच्या नावावर १३ बँक खाती असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.

भुजबळच्या नावावर नऊ खाती

या प्रकरणातील विकास भुजबळ (२४) हा पिंपरी-चिंचवड परिसरातील असून त्याच्या नावावर नऊ म्यूल खाती असल्याचे तपासात आढळले आहे.भुजबळचा नेमका व्यवसाय काय होता, खरातशी त्याची ओळख कशी झाली आणि त्याने ही खाती कोणाला उपलब्ध करून दिली, याचा तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT