मुंबई

Mumbai rain update | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले, झाडे कोसळली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शहर व उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पश्चिम उपनगरातील मालाड कोकणी पाडा, कुरारगाव, सीता नगर, चिमणबाई चाळ, सुरेश भवन येथे घरांमध्ये पाणी शिरले. बहुतांश घरामध्ये कंबरभर पाणी साठले होते. त्यामुळे घरातील फर्निचरसह अन्य वस्तूंची नासधूस झाली. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मुंबई शहर व उपनगरात मंगळवारी पहाटे सुरू झालेल्या पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर मध्यरात्री धो.. धो.. ओतण्यास सुरुवात केली. सकाळपर्यंत २४ तासात शहरात १९५ मिमी, पश्चिम उपनगरात २०८ मिमी व पूर्व उपनगरात १६७ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री पावसाचा जोर असल्यामुळे पश्चिम उपनगरातील झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी धाव घेत, महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचाव कार्य हाती घेतले. पण पाण्याचा वेग इतका होता की घरात जाणारे पाणी रोखणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये कंबरेपेक्षा जास्त पाणी होते. त्यामुळे फर्निचर, कपडे, व अन्य वस्तू पाण्यामध्ये गेल्या.

पावसाचा जोर कमी झाला असला तरी, मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे मुंबई महानगरपालिकेची पाणी निचऱ्याची व्यवस्था कमजोर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नाले नद्या भरलेले नसतानाही पावसाळी पाणी जाण्याच्या मेनहोलवर मोठ्या प्रमाणात कचरा आल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे मध्यरात्री महापालिकेचे कामगार ठिकठिकाणी कार्यरत होते. पाणी निचरा करणाऱ्या प्रवेशद्वारावर आलेला कचरा काढल्यानंतर पाण्याचा तातडीने निचरा झाला. पण तोपर्यंत अनेकांचे आर्थिक नुकसान झाले याला जबाबदार कोण असा सवाल आता आजी माजी नगरसेवकांनी केला आहे.

२३ जून सकाळी ८ ते २४ जून सकाळी ८ पर्यंतचा पाऊस

  • शहर : १९५ मिमी,

  • पश्चिम उपनगर : २०८ मिमी

  • पूर्व उपनगरात : १६७ मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT