Mumbai Mobile Theft Gang Pudhari
मुंबई

Mumbai Mobile Theft Gang: एक धक्का, चार हात आणि मोबाईल गायब! मुंबईतील ‘धक्का गँग’चा पोलिसांनी केला पर्दाफाश

आधी व्हॉट्सॲपवर ‘ग्रीन सिग्नल’, मग बसमध्ये धक्काबुक्कीचा प्रसंग उभा करत मोबाईल लंपास

पुढारी वृत्तसेवा

महेश पांचाळ

मुंबई: गर्दीच्या बसमध्ये प्रवाशांना धक्काबुक्की करून मोबाईल चोरणाऱ्या ‘धक्का गँग’चे नेटवर्क एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या टोळीतील प्रत्येक सदस्याची चोरीमध्ये ठरावीक भूमिका होती.

त्यामुळे एका प्रवाशाच्या खिशातून काढलेला मोबाईल काही क्षणांतच एका सदस्याकडून दुसऱ्याकडे देत सुरक्षितपणे बाहेर काढला जात असे. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात त्यांच्या गुन्ह्यांच्या पद्धतीची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सॲपवर रोज सकाळी नियोजन

टोळीतील सदस्य रोज सकाळी व्हॉट्सॲप कॉलवर संपर्क साधून चोरीचे नियोजन करत असत. कोणत्या भागात जायचे, कोणत्या बस मार्गावर गर्दी आहे आणि कुठे लक्ष्य करायचे, याची माहिती एकमेकांना दिली जात असे. दुपारच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन चोरीला सुरुवात करत.

पोलिसांच्या तपासात टोळीतील सदस्य एकमेकांच्या हालचालींवरही लक्ष ठेवत असल्याचे निदर्शनास आले. एखादा साथीदार पोलिसांच्या ताब्यात गेला किंवा परिसरात पोलिसांची हालचाल वाढली तर टोळीचा मुक्काम आणि चोरीचे ठिकाण बदलले जात असे.

या टोळीने चोरीसाठी अक्षरशः ‘असेंब्ली लाइन’ पद्धत तयार केली होती. वासिम शेख नावाचा चोर हा ‘मशीन’ म्हणून काम करत होता. गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या खिशातून मोबाईल काढण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. दुसरा अझहर मिर्झा हा ‘छप्पर देणारा’ होता. तो बॅग किंवा अन्य वस्तूच्या आडोशाने मोबाईल काढण्याची हालचाल इतर प्रवाशांच्या नजरेस पडू नये, याची काळजी घेत असे.

यानंतर तिसरा फिरोज खान हा ‘चार्मर’ची भूमिका बजावत असे. त्याच्याकडे चोरीचा मोबाईल दिल्यानंतर तो तो पुढे दिलशाद अली ऊर्फ ‘बूर’ याच्याकडे सोपवत असे. ‘बूर’चे काम चोरीचा माल घेऊन गर्दीतून पसार होणे असे. टोळीतील उर्वरित सदस्य कव्हर देण्याचे काम करत. ते संबंधित प्रवाशाभोवती गर्दी करून त्याचे लक्ष विचलित करत. त्यामुळे प्रवाशाला मोबाईल चोरीला गेल्याचे समजेपर्यंत तो अनेक हातांतून पुढे गेलेला असे.

अंधेरी पूर्वेत कार्यक्षेत्र

टोळीचे मुख्य कार्यक्षेत्र अंधेरी पूर्व परिसरातील गर्दीचे बेस्ट बस मार्ग होते. अंधेरी-सीप्झ आणि अंधेरी-घाटकोपर मार्गावरील गर्दीच्या बस त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. अंधेरी पश्चिम परिसरात दुसऱ्या टोळीचे कार्यक्षेत्र असल्याने तेथे जाणे ते शक्यतो टाळत होते.

टोळीतील दोन साथीदार यापूर्वी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर उर्वरित सदस्यांनी आपला मुक्काम जुईनगर परिसरात हलवला होता. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचला आणि सात जणांना अटक केली.

‘धक्का’ केवळ धक्का नसतो!

एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईमुळे गर्दीच्या बसमध्ये मोबाईल चोरीची संघटित आणि ठरावीक पद्धत समोर आली आहे. एक जण धक्का देतो, दुसरा मोबाईल काढतो, तिसरा चोरी झाकतो आणि चौथा माल घेऊन पसार होतो.

काही सेकंदांत संपूर्ण ‘ऑपरेशन’ पूर्ण होते. त्यामुळे गर्दीच्या बसमध्ये वारंवार किंवा मुद्दाम धक्के बसत असतील तर सावध राहा. मोबाईल मागच्या खिशात ठेवणे टाळा आणि गर्दीत बॅग समोर ठेवा. मुंबईच्या गर्दीतला प्रत्येक धक्का साधा नसतो; कधी तो तुमच्या मोबाईलवर डल्ला मारण्याचा पहिला डाव असू शकतो याकडे प्रवाशांनी लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दीड महिन्यात १३५ मोबाईल

पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीने गेल्या सुमारे दीड महिन्यात किमान १३५ महागडे मोबाईल चोरले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. चोरीचे मोबाईल दुरुस्त करून त्यांची बांगलादेश आणि नेपाळमध्ये विक्री केली जात होती, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. अर्थात विदेश गेलेले मोबाईल हाती लागण्याची शक्यता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT