

मुंबई: या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई महानगर प्रदेशात १०० किमीचे मेट्रोमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर आता वर्षअखेरीस कार्यरत मेट्रोमार्गांची लांबी १५० किमीपर्यंत पोहोचणार आहे. मेट्रो २ब, मेट्रो ४, मेट्रो ५ आणि मेट्रो ९ यांचे उर्वरीत टप्पे सुरू होणार असल्याने महामुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवेला बळकटी मिळण्याची आशा आहे.
दहिसर ते डीएननगर मेट्रो २ अ मार्गिका १८.६ किमीची आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिका १६.५ किमीची आहे. या दोन्ही मार्गिका २०२२-२३ पासून सुरू आहेत. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका ११.४० किमी असून ती २०१४ पासून प्रवासी सेवेत आहेत. तसेच ऑक्टोबर २०२४पासून टप्प्याटप्प्याने ३३.५ किमीची मेट्रो ३ भुयारी मार्गिका सुरू करण्यात आली.
नवी मुंबई मेट्रो १ मार्गिकेचा बेलापूर ते पेंढार हा ११.१ किमीचा टप्पा नोव्हेंबर २०२३ साली सुरू झाला. यावर्षी एप्रिलपासून दहिसर ते काशिगाव ४.७ किमी मार्गावर मेट्रो ९ आणि डायमंड गार्डन ते मंडाळे ५.६ किमी मार्गावर मेट्रो २ ब मार्गिका सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण महामुंबईत सध्या कार्यान्वित असलेल्या मेट्रो मार्गिकांची एकूण लांबी १०१.४ किमीवर पोहोचली आहे.
मेट्रो २ब मार्गिकेवरील चेंबूर मेट्रो स्थानक लवकरच सेवेत येणार आहे. त्यानंतर उर्वरीत चेंबूर ते डीएननगर टप्पाही पूर्ण केला जाईल. यामुळे मेट्रो २ ब मार्गिकेचा उर्वरीत १८ किमीचा टप्पाही सुरू होईल. मेट्रो ९ मार्गिकेचा उर्वरीत ६.६८६ किमीचा टप्पा सुरू झाल्यानंतर ही मार्गिका मिरा-भाईंदरला जोडेल.
मेट्रो ४ अंतर्गत कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन आणि ४ अ अंतर्गत कासारवडवली ते गायमुख या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मार्गिका एकूण १०.५ किमीची आहे. मेट्रो ५ मार्गिकेचा ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा ११.९ किमीचा आहे. या वर्षअखेरीस तो सुरू होईल. अशाप्रकारे या वर्षी आणखी ५० किमी मेट्रो मार्गिका सुरू होऊन महामुंबईत १५० किमीचे मेट्रोजाळे कार्यान्वित होईल.