Mumbai Builders Illegal Bars
मुंबई : मुंबईतील बारा गिरण्यांच्या जागांवर बिल्डरांनी पब, बार, रेस्टॉरंट उभारून घोटाळा केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची समिती नेमली आहे.
बारा गिरण्यांच्या जागांबाबत पालिका अधिकार्यांकडून माहिती घेतली असता कमला मिलप्रमाणे या सर्व गिरण्यांच्याही जमिनी काढण्यात आल्याचे समोर आले आहे. आयटी क्षेत्रासाठीचा एफएसआय वापरून त्या जागांवर पब, बार, रेस्टॉरंट उभारण्यात आले आहेत. बिल्डरांनी अनियमितता करून, अवैधपणे आयटीसाठीच्या जादा एफएसआयचा वापर दुसर्याच कामासाठी करत या जागा बळकावल्या आहेत.
या प्रकरणात अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांसह अभ्यासकांचा समावेश असणार आहे. या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून अशा जागांबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.
या समितीचाही अहवाल आल्यानंतर मिलच्या जागांवर अनियमितता करणार्या बिल्डरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले.
या समितीच्या अहवालानंतर आश्वासन समितीचे सदस्य या बारा मिलच्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही राणा म्हणाले. यानिमित्ताने नियमबाह्य पद्धतीने मुंबईतील गिरण्यांच्या जागांवर चालणारे पब, बार आणि रेस्टॉरंट आता आश्वासन समितीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.