मुंबई : मुंबई मेट्रो 3 च्या तिकिटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या नावांचा उल्लेख सी एस एम टर्मिनस आणि जेएसएस मेट्रो असा अर्धवट करण्यात आला आहे. या महापुरुषांच्या नावांचा मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्ट व संपूर्ण उल्लेख करावा, या मागणीसाठी ‘नाना’प्रेमी मेट्रोच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांना पत्र धाडणार आहेत.
नामदार जगन्नाथ (नाना) शंकर शेट प्रतिष्ठानने निवेदनाद्वारेे प्रशासनाला अवगत केले आहे. मेट्रो स्थानकाबाहेरील फलकावर जगन्नाथ शंकरशेट असे, तर स्थानकातील इंडिकेटरवरही शंकरशेट स्थानक असे एकेरी नाव येत आहे. त्याऐवजी जगन्नाथ (नाना) शंकरशेट असे पूर्ण नाव दर्शवण्याची मागणी करण्यात आली आहे. नावे अपुरी लिहून प्रशासनाकडून या महापुरुषांचा अपमान केला जात आहे, जो शिवप्रेमी आणि ‘नाना’प्रेमी कदापि सहन करणार नाहीत, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सल्लागार प्रकाश चिखलीकर यांनी पुढारीला सांगितले.
प्रशासनाला ही चूक सुधारण्यासाठी आणि सुधारित तिकीट प्रणाली लागू करण्यासाठी महिन्याचा कालावधी दिला आहे. या मुदतीत बदल न झाल्यास मेट्रो प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिष्ठानने दिला आहे. तसेच, स्थानकाच्या दर्शनी भागात जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या कार्याची ओळख म्हणून माहिती फलक लावण्याची विनंतीही केली आहे.