Mumbai Metro Line 3 Phase 2A Opening Date Fare
नमिता धुरी, मुंबई : पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास आता वेगवान होणार आहे. आरे जेव्हीएलआर येथून वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत भुयारी मेट्रोने केवळ ३६ मिनिटांत पोहोचता येणार आहे. मेट्रो ३ भुयारी मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारपासून या मार्गावर मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मुंबई महानगर क्षेत्रासाठी पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्प आहे. यापैकी आरे जेव्हीएलआर ते बीकेसीपर्यंतची मार्गिका ऑक्टोबर २०२४पासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्यातही प्रवास करता येणार आहे. या मार्गावर धारावी, शितळादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. यातील धारावी हे स्थानक मिठी नदीखाली बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे काम तांत्रिकदृष्ट्या जिकिरीचे होते.
दर सहा मिनिटांनी मेट्रोची फेरी
नव्याने सुरू झालेल्या मार्गिकेची लांबी ९.७७ किमी आहे. आरे ते बीकेसी या मार्गावर दर साडे सात मिनिटांनी मेट्रो फेऱ्या होत होत्या. मेट्रो मार्ग विस्तारल्याने आता दर ६.२० मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या होतील. आरे ते बीकेसी हे अंतर २२ मिनिटांत गाठता येत होते. त्यापुढील अंतर १४ ते १५ मिनिटांत पार करता येणार आहे. दिवसभरात या मार्गावर २४४ फेऱ्या होणार आहेत.
बीकेसी आणि वरळी या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांना भुयारी मेट्रोची जोडणी मिळाली आहे. बीकेसी स्थानक हे मेट्रो २ ब मार्गिका आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यांसारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यांसारखी मनोरंजनाची ठिकाणेही या मार्गाने जोडली जाणार आहेत.
शनिवारी सकाळी ६.३० वाजता वरळीसाठी पहिली मेट्रो सुटणार आहे. रात्री १०.३० वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील. आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक असा प्रवास करण्यासाठी एकमार्गी ६० रुपयांचे तिकीट प्रवाशांना काढावे लागेल.
ऑगस्टमध्ये कफ परेडपर्यंत
'भुयारी मेट्रोच्या उभारणीत अनेक अडचणी होत्या. सर्व अडचणींवर मात करून ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भुयारी मेट्रो हा एक अभियांत्रिकी आविष्कार असून तिची प्रवासी संख्या वाढतेय. ऑगस्टमध्ये या मेट्रोच्या उर्वरित टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच सर्व सार्वजनिक परिवहन सेवांसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.