

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने देशभरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांचे श्रद्धास्थान प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने भाविकांच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हार, नारळ आणि पूजेच्या इतर साहित्यावर तात्पुरती बंदी घालण्याचे ठरवले आहे. न्यासाकडून तशी अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र शुक्रवारी याबाबत निर्णय जाहीर होणार आहे.
मुंबईकरांचे अराध्यदैवत सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवारी तर लाखो भाविक येत असतात. शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी पडल्याने भाविकांची गर्दी आता वाढली आहे. मुंबईबाहेरुन येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या भाविकांची सुरक्षाही महत्त्वाची झाली असून मंदिर न्यासाकडून काही सुरक्षा उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. यात दर्शनासाठी मंदिरात येताना भाविकांना हार, नारळ नेण्यास तात्पुरती बंदीची शक्यता आहे. सोबत लॅपटॉप बाळगण्यासही मनाई होणार आहे. याबाबत न्यासाने अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. शुक्रवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने सिद्धिविनायक मंदिरात गुरुवारी विशेष पूजा व आरतीचे आयोजन केले होते. यावेळी भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, तसेच विश्वस्त भास्कर शेट्टी, गोपाळ दळवी आणि महेश मुदलियार उपस्थित होते.