मुंबई: वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन सोमवारपासून कमी अंतराच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यानुसार मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेल्या वेळेत अंधेरी ते घाटकोपर दरम्यानच मेट्रो चालवली जाईल.
मेट्रो १ मार्गिका ११.४ किमीची असून यावर १२ स्थानके आहेत. दररोज ५ लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी ८८ टक्के प्रवासी अंधेरी ते घाटकोपर दरम्यान प्रवास करतात. वाढती गर्दी पाहता मेट्रोगाडी ६ डब्यांची करण्याचा विचार सुरू आहे.
दर दोनपैकी एक गाडी अंधेरीपर्यंतच धावेल. दुसरी गाडी वर्सोव्यापर्यंत जाईल. यामुळे गर्दीच्या वेळी २० टक्के अधिक म्हणजेच साधारण २८ हजार अतिरिक्त प्रवासी वाहून नेले जातील. सध्या गर्दीच्या वेळेत दोन फेऱ्यांमधील अंतर ३ मिनिटे २० सेकंद आहे. तर गर्दी नसताना हा प्रतीक्षा कालावधी ५ मिनिटे ५५ सेकंदांचा आहे.
कमी अंतराच्या फेऱ्या चालवताना दैनंदिन फेऱ्यांची संख्या ४७६ वरून ४८४ पर्यंत जाईल. दर तासाला तीन अधिक फेऱ्या होतील. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रतीक्षा कालावधी ३ मिनिटांपर्यंत कमी होईल. कमी अंतराच्या फेरीची पहिली गाडी सोमवारी संध्याकाळी ६.२३ वाजता अंधेरी येथून सुटेल. तर शेवटची कमी अंतराची गाडी रात्री ८.२३ वाजता सुटेल.