Metro 4 pudhari photo
मुंबई

Mumbai Metro 4 Accident: मुलुंड अपघातानंतर सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी

मुलुंड अपघातानंतर सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुलुंड येथे मेट्रो मार्गिकेच्या बांधकामातील काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर आता मेट्रो 4 मार्गिकेसह सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो 4 प्रकल्पाच्या सल्लागार कंपनीची हकालपट्टी करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मेट्रो 4 मार्गिकेच्या बांधकामातील काही भाग दोन वाहनांवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता व दोन जण गंभीर जखमी आहेत. यानंतर मेट्रो मार्गिकांच्या बांधकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे सर्वप्रथम अपघातग्रस्त मेट्रो 4 मार्गिकेची सुरक्षा तपासणी करण्यात येत आहे. मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग व मेट्रो 4 अ मार्गिका यावर्षी सुरू करण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी कामाच्या दर्जाची सुरक्षा तपासणी केली जात आहे.

लवकरच मेट्रो 2 ब व मेट्रो 9 मार्गिका अंशत: सुरू करण्यात येणार आहेत. या मार्गिकांची सुरक्षा तपासणीही आवश्यक आहे. तसेच एमएमआरडीएकडून सध्या मेट्रो 5, मेट्रो 6, मेट्रो 7अ इत्यादी मार्गिकांची बांधकामेसुद्धा सुरू आहेत. उन्नत मार्गिकांची बांधकामे करताना मेट्रोपुलाखालून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.

सल्लागार कंपनी काळ्या यादीत

मेट्रो 4 मार्गिकेवर झालेल्या अपघाताप्रकरणी एमएमआरडीएने डीबी एचआयएलएल-एलबीजी या सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली आहे. कंत्राट रद्द करून सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एलबीजी कंपनीविरोधात मोनोरेल प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT