मुंबई : येत्या तीन महिन्यांत ३७ किलोमीटर मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी किमान ५० किलोमीटरपर्यंत त्याची व्याप्ती वाढवावी. पुढच्या वर्षभरात ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करून २०२७ हे वर्ष ‘मेट्रो वर्ष' बनवावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या.
‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. शिवडी ते वरळी उन्नत रस्ता जोडणी, मेट्रो मार्गिका क्रमांक नऊ दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर, मेट्रो मार्गिका क्रमांक पाच ठाणे ते धामणकर नाका आणि कशेळी डेपो, मेट्रो मार्गिका क्रमांक (दोन ब ) डी एन नगर ते डायमंड गार्डन - मंडाले, मेट्रो मार्गिका क्रमांक सहा स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी आणि छत्रपती संभाजी नगर शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तर, मेट्रो मार्गिका २-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यतेनुसार रविवारी १२ तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा. या कामामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा. वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधावा. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मेट्रो मार्गिका क्रमांक सहा मधील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान जमिनीच्या ताब्याबाबत व न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधा घटकांचे अद्ययावत ' मॅपिंग ' करावे. नागरी सुविधा किंवा पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध होऊन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होईल, अशी यंत्रणा विकसित करावी. प्रकल्पस्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करणारी स्वतंत्र कंपनी निर्माण करून या सेवांसाठी अत्यल्प दराचे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.
छत्रपती संभाजीनगरात प्रत्येकाला नळजोडणी द्यावी
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घ्यावी. नळ जोडणी देताना पुन्हा खोदकाम करावे लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करावे. वेळेत काम पूर्ण न करणार्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.