मुंबईची मेट्रो सुसाट, मोनो थकली pudhari photo
मुंबई

Mumbai Train : मुंबईची मेट्रो सुसाट, मोनो थकली

सध्या नव्या मोनोगाड्यांची जुन्या प्रणालीसह जोडणी करण्याचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

मेट्रो 2 ब मार्गिकेमुळे पूर्व उपनगरवासीयांना तर मेट्रो 9 मार्गिकेमुळे मिरा-भाईंदरकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे; मात्र हे स्वप्न 2025 या वर्षात अपूर्णच राहिले. याउलट, दक्षिण मुंबईला मात्र पहिलीवहिली भुयारी मेट्रो याच वर्षी मिळाली. याशिवाय मेट्रोचे तिकीट काढण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र वर्ष संपतासंपता मोनोने मान टाकली आहे.

आरे ते कफ परेड या 33.5 किमी भुयारी मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा 2024 मध्ये सुरू झाला होता. त्याचा वरळीपर्यंतचा विस्तार मे 2025 मध्ये करण्यात आला. एवढेच नव्हे तर ऑक्टोबर 2025 पासून ही मेट्रो कफ परेडपर्यंत धावू लागली आहे. प्रवाशांचाही या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे नियोजीत भुयारी मार्गांवर पुढील वर्षांत भर दिला जाणार आहे.

मेट्रा सेवेची धावपट्टी मुंबईत चौफेर पसरत असताना तोट्यात सुरू असलेली मोनोरेल सेवा मात्र घायुकुतीला आली आहे. 19 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली असताना मोनोरेलमध्ये प्रचंड गर्दी झाली. यामुळे मैसूर कॉलनी आणि आचार्य अत्रे स्थानक या दोन ठिकाणी एकाच दिवशी दोन मोनोगाड्या बंद पडल्या. दोन स्थानकांदरम्यान बंद पडलेल्या मोनोगाडीत अनेक प्रवासी गुदमरले. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. यानंतर मोनोसेवा बंद करण्यात आली. सध्या नव्या मोनोगाड्यांची जुन्या प्रणालीसह जोडणी करण्याचे काम सुरू आहे.

मेट्रो तिकीट मिळवणे सोपे

9 ऑक्टोबरपासून मुंबई वन या ॲपची सुरुवात झाली. या ॲपमध्ये मेट्रो, मोनो, बस, उपनगरीय रेल्वे अशा 11 वाहतूक घटकांना सामावून घेण्यात आले आहे. या ॲपमुळे एकाच तिकिटाद्वारे बस, मेट्रो आणि रेल्वेने प्रवास करता येणार आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 ब आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 या संयुक्त मार्गिकेचे तिकीट 10 डिसेंबरपासून 14पेक्षा अधिक ॲप्सवर उपलब्ध झाले आहे.

सिग्नलविरहीत प्रवास

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारित रस्त्याचे लोकार्पण 14 ऑगस्टला करण्यात आले. दक्षिण आशियातील हा पहिला अशा प्रकारचा केबल-स्टेड ब्रिज आहे. ज्यामध्ये 100 मीटरचे तीव्र वळण आहे. या रस्त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत सिग्नल फ्री प्रवास करणे यावर्षीपासून शक्य झाले. कलानगर उप-उड्डाणपुलामुळे धारावी आणि वांद्रे वरळी सागरी सेतू जोडला जात आहे. यामुळे पूर्व-पश्चिम जोडणी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई ते धारावी सिग्नलविरहित प्रवास करता येणार आहे.

मुंबईबाहेर जाणे सोपे

नागपूर ते मुंबई 701 किमीच्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जूनला पार पडले. यामुळे समृद्धी महामार्ग प्रथमच महामुंबईत दाखल झाला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे म्हणजेच पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण 5 जूनला करण्यात आले. यामुळे मुंबई व नवी मुंबई यांच्यातील प्रवासाला गती मिळाली.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक मिसिंगच

मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर आणि वेळ कमी करणारी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प या वर्षात सेवेत दाखल होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्षअखेरपर्यंत ही सेवा प्रवाशांना लाभली नाही. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT