मुंबई ः 2016 मध्ये दोघा शिक्षकांना केलेल्या मारहाण प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना दोषमुक्त करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात दोषमुक्तेसाठी रितू तावडे यांनी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. मानथकर यांनी फेटाळून लावला. याचवेळी तावडे यांच्यावर मारहाणीच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे महापौर तावडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
29 जुलै 2016 रोजी वाकोला परिसरातील महापालिकेच्या एका उर्दू माध्यम शाळेत ही घटना घडली होती. शाळेतील एका शिक्षिकेची बदली वांद्रे-कुर्ला संकुल येथील दुसऱ्या विभागात करण्यात आली होती. संबंधित शिक्षिका कर्करोगाने ग्रस्त असल्याने तिच्या बदलीला विरोध करण्यासाठी रितू तावडे व इतर सहा जण शाळेत गेले होते.
तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी दोन शिक्षकांना कानाखाली मारल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तावडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 (सरकारी कामात अडथळा), 332 (दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तावडे यांनी त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेत त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे आधार असल्याचे स्पष्ट केले. त्याच अनुषंगाने दोषमुक्त करण्यास नकार देऊन त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयामुळे महापौर तावडे यांच्याविरुद्ध मारहाण खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.