मुंबई : मुंबई महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापौर निधीतून तातडीने गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाईल, अशी सर्वसामान्य मुंबईकरांची समज होती. परंतु सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत एकाही गरजू रुग्णाला त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेचे शेकडो अर्ज महापालिका मुख्यालयात पडून आहेत.
मुंबई महानगरपालिका 8 मार्च 2022 मध्ये विसर्जित झाल्यानंतर मुंबईतील गरजू रुग्णांना महापौर वैद्यकीय निधीतून मिळणारी आर्थिक मदत बंद झाली. ही आर्थिक मदत गरजूंना मिळावी यासाठी मुंबईकरांनी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही मागणी केली होती. मात्र गरजूंना वैद्यकीय मदत मिळालीच नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे विराजमान झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशी सर्वसामान्य रुग्णांची अपेक्षा होती. पण वैद्यकीय मदतीसाठी महापौर कार्यालयात देण्यात आलेल्या अर्जावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपल्याला वैद्यकीय मदत कधी मिळेल, याकडे मुंबईतील गोरगरीब रुग्णांचे लक्ष लागले आहे.
महापौर वैद्यकीय निधीतून मुंबईतील गोरगरीब रुग्णांना आपल्या उपचारासाठी 5 रुपये ते 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. या मदतीमध्ये 50 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर रितू तावडे यांनी जाहीर केले होते. परंतु सध्या देण्यात येणारी 5 ते 25 हजारांची मदतही अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे मदतीसाठी गोरगरीब जनतेला अन्य सेवाभावी संस्थांकडे खेपा माराव्या लागत आहेत.
महापौरांकडे वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सुमारे 100 ते 150 जणांनी अर्ज केले असल्याची समजते. यात कर्करोग, किडनी, हृदयरोग तसेच डायलेसिसच्या उपचारांकरिता मदत मिळावी म्हणून अर्ज करणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे.
लेखापाल विभागाकडे अर्ज पाठवले
महापौर वैद्यकीय निधीतून गरजूंना मदत मिळावी, यासाठी पालिकेच्या लेखापाल विभागाकडे अर्ज पाठवण्यात आले आहेत. लेखापाल विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर महापौरांच्या हस्ते रुग्णांना वैद्यकीय मदतीचा चेक त्या त्या हॉस्पिटलच्या नावाने वितरित करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.