मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटात फोडाफोडी होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळणार जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे भाजपचे लोहपुरुष असून, शिवसेना फोडल्यामुळे अमित शहा त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. कुणीतरी त्यांना दिल्लीतून ‘चावी’ देत आहे; अन्यथा 29 नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी महापौरपदावर दावा सांगितला असता का? भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये म्हणून दिल्लीतून शिंदेंना ‘चावी’ देणारा कोण? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत वादाला तोंड फोडले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला चार दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार, हे स्पष्ट झालेले नसतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नवनिर्वाचित नगरसेवक फुटू नयेत, यासाठी सर्वांना पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. त्यापार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत शिंदे गटाचा महापौर होणार नाही, असा दावा करत आमच्या शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या घरी असून, त्यांची बैठक ‘मातोश्री’वरच होत आहे; पण शिंदे गटाला त्यांचे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून का ठेवावे लागले आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा हल्ला चढवत भाजपचा महापौर होऊ नये म्हणून त्यांचा सहकारी पक्ष देव पाण्यात घालून बसला आहे. आता त्या दोघांमध्ये काय होते त्याचा आधी निकाल लागू द्या; मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. ‘टायगर अभी जिंदा है...’ असे म्हणत शिवसेना आणि त्यांच्या सहकारी पक्षांजवळ सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करू शकेल एवढा आकडा आहे. सध्या आम्ही फक्त मजा पाहत आहोत, असेही राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या भाषणात मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, मुंबईत कुणाला बसवायचे हे दिल्लीत ठरलेले आहे. भाजपच नाही, तर गौतम अदानीही ठरवणार आहेत की मुंबईत कुणाला बसवायचे, असा टोला लगावत ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत ते पाहता कुणालाही सहजतेने महापौर बसवणे सोपे नाही. भाजप कितीही मोठा विजयोत्सव करत असला, तरी त्यांचा विजय झालेला नाही, असेही राऊत म्हणाले.
मुंबईला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची परंपरा आहे. भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल, अशी टीका राऊत यांनी केली. मोरारजी देसाई यांनी 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच असेल, असेही ते म्हणाले.