Matang Reservation Protest Pudhari
मुंबई

Matang Reservation Protest: आझाद मैदान परिसरात मातंग समाजाचा मोर्चा! आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी रस्ता रोको

१३ टक्के अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी; शासन निर्णय होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा आंदोलकांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी प्रलंबित राहिल्याने संतप्त मातंग समाजाने आज आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला.

मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत भर रस्त्यांवर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिसांना काही रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे.

सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानात हा विराट मोर्चा काढण्यात आला आहे. उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलनाच्या नेत्यांनी घेतला आहे. राज्यभरातून पाच लाख मातंग बांधव मुंबईत येणार आहेत.

या आंदोलनात सर्वपक्षीय मातंग नेते एकत्र आले असून माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, रमेश बागवे, दिलीप कांबळे, माजी आमदार नामदेव सासणे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर तसेच विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत निकाल दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने या विषयाच्या अभ्यासासाठी दोन ते अडीच महिन्यांत न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालावर अंतिम निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जुलै मधील पावसाळी अधिवेशनात दिले होते.

मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही शासनाने अहवाल स्वीकारला नाही की त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. या दिरंगाई विरोधात मातंग समाजाने राज्यभरात ७२ मोर्चे काढूनही राज्य प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने अखेर समाजाने आज २९ सप्टेंबर रोजी थेट राजधानीत आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT