मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लहान-मोठा तिरंगा ध्वज, तिरंगी गांधी टोपी, तरुण-तरुणींसाठी तिरंगी रंगाचे कपडे, महिलांच्या साड्यांसह लहान मुलींच्या आकर्षक बांगड्या, कानातील टॉप्स अशा तिरंगी साहित्याने मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. त्यात सलग सुट्ट्या आल्यामुळे मस्जिद बंदर, काळबादेवी येथील मंगलदास मार्केट परिसर, दादर, अंधेरी, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा यंदा साहित्य दरांत कोणतीही वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
सोमवारी (दि.26)प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे खादी तिरंगी ध्वज, तिरंगी गांधी टोपी, शर्टावर लावण्यासाठी तिरंगा ध्वज, मुला-मुलींचे तिरंगी कपडे, बांगडया, कानातील टॉप्स आदी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठा ग्राहकांनी फुलू लागल्या आहेत. खादी तिरंगी ध्वज 150 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत आहेत.
याचबरोबर तरुण-तरुणींसाठी तिरंगी रंगाचे कपडे 500 रुपयांपासून ते 1200 रुपयापर्यंत, तर तिरंगी रंगाची साडी 400 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून तिरंगी रंगाच्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
अशा आहेत वस्तूंच्या किमती
बाजारात तिरंगी रंगाच्या 12 नग बांगड्यांची किंमत 300 रुपये, तर हेअर बॅण्ड 70 रुपयांना आहेत. तसेच 5 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांचे तिरंगी टी-शर्ट 60 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत, टाय बॅच 6 नग 60 रुपये, तिरंगी बिल्ले 12 नग 30 रुपये, मुलांच्या हातातील तिरंगी बँड 20 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत, तर इंडिया नावाची तिरंगी टोपी सुमारे 60 रुपयांना आहे. दुचाकी वाहनांवर लावण्यासाठी तिरंगी ध्वज 10 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी 30 रुपये असा दर आहे.
तिरंगी टोप्या, लहान मुलांचे तिरंगी टी-शर्ट, लहान मुलींच्या तिरंगी रंगाच्या बांगड्यांना ग्राहकांची पसंती आहे. याचबरोबर कॉर्पोरेट ऑफिस, दुकान सजावटीसाठी तिरंगी ध्वज 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत (12 नग) असे दर आहेत. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.सुधीर शर्मा, विक्रेते, मस्जिद बंदर