Mumbai Market Pudhari
मुंबई

Mumbai Market Redevelopment: मुंबईतील मंडईंचा विकास वेगात; बाबू गेनू मंडई पूर्ण, पाच पुनर्विकास आराखडे मंजुरीच्या प्रतीक्षेत

महापालिकेच्या बाजार विभागाकडून टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण; दिवाळीपूर्वी नव्या मंडईंच्या कामाला प्रारंभ होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मंडईंचा विकास सुरू असून आतापर्यंत बाबू गेनू मंडईचे काम पूर्ण झाले आहे. टोपीवाला, महात्मा ज्योतिबा फुले, शिरोडकर, भाऊराव हरिचंद्र चेंबूरकर या मंडईंचे काम प्रगतीपथावर आहे. तर पाच मंडईंचे आराखडे तयार झाले असून ते प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिका बाजार विभागाच्या अखत्यारीत 92 किरकोळ मंडई व समायोजन आरक्षणांतर्गत मिळालेल्या 105 मंडई, तसेच 16 खासगी मंडई आहेत. या मंडईंचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येत आहे. यात काही मंडळींचे पुनर्बांधकाम तर काहींची व्यापक दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे मंडईंमध्ये विविध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना ऐसपैस व सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत कुलाबा मंडईसह मुलुंड पूर्व, जिजामाता, डोंगरी, सांताक्रुझ, लक्ष्मणराव यादव, फोर्ट, लालबहादूर शास्त्री या मंडईंच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. सर एपी मंडई, हॉकर्स प्लाझा, डी. एन. नगर या मंडईंच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून बांद्रा टाऊन मंडईसह अण्णासाहेब वर्तक व मालवणी या तीन मंडईंची व्यापक दुरुस्तीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे बाजार विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जोगेश्वरी नवलकर मंडईसह बोरिवली, लक्ष्मण मोरे, हेमंत मांजरेकर,

मरोळ चर्च रोड आदी पाच मंडईचे पुनर्विकासाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. हे आराखडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले असून प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करून दिवाळीपूर्वी या मंडळाच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT