Pudhari
मुंबई

BMC Encroachment Removed |मानखुर्दमध्ये १४ एकर जागेवरील अतिक्रमणाविरोधात बीएमसीची मोठी कारवाई; पोलिसांचे ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात

मानखुर्द परिसरातील एकता नगर येथे अवैध अतिक्रमणाविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाकडून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Mankhurd Illegal Encroachment Removed

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरातील एकता नगर येथे अवैध अतिक्रमणाविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तब्बल १४ एकर जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकता नगर परिसरातील ही जमीन कलेक्टर लँड असून खाडी परिसरालगत असलेली महत्त्वाची व्यावसायिक (कमर्शियल) जमीन आहे. गेल्या काही वर्षांत या जागेवर स्क्रॅप व्यवसायाशी संबंधित काही घटकांनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून विविध प्रकारच्या संरचना आणि शेड्स उभारल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर संबंधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली.

बीएमसीच्या पथकांनी सकाळपासून जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलिसांचे ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिक विभागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) समीर शेख स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि महसूल विभागाचे कर्मचारीही कारवाईत सहभागी झाले आहेत.

विशेष म्हणजे, संपूर्ण परिसरावर ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे. अतिक्रमणग्रस्त भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, यापूर्वी या परिसरात अनेकदा आगीच्या घटना घडल्या असून त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, अतिक्रमण हटविण्याचे काम वेगाने सुरू असून आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण १४ एकर जागा अतिक्रमणमुक्त करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर मोठा आळा बसणार असून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT