Mumbai Manhole Cover Theft Pudhari
मुंबई

Mumbai Manhole Cover Theft: मॅनहोल झाकणांची चोरी सुरूच; चोरलेली झाकणे बदलण्यासाठी पालिकेला ९० लाखांचा भुर्दंड

वर्षभरात ६०० ते ६५० झाकणे चोरीला गेल्याची माहिती; दक्षिण आणि मध्य मुंबईतील झाकणे बदलण्याचे काम हाती घेणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील पर्जन्य जलवाहिनीच्या मॅनहोलवर असलेली झाकण चोरी सुरूच आहे. गेल्या वर्षभरात ६०० ते ६५० झाकण चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या मॅनहोलवर पुन्हा झाकणे बसवण्यासाठी महापालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दक्षिण मुंबईचा मध्य मुंबईतील मॅनहोलची चोरीला गेलेली झाकणे बदलण्यासाठी आता ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई शहर व उपनगरात मॅनहोलच्या झाकणांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्यामुळे मुंबई महापालिकेचे जल अभियंता व मलनि:सारण व पर्जन्य जलवाहिनी विभाग त्रस्त आहे. झाकणांची चोरी होऊ नये म्हणून महापालिकेने संपूर्ण शहरांमध्ये पथकही नेमली आहे. रात्री मध्यरात्रीही पथक अचानक ठिकाणी भेटी देऊन, झाकण चोरीवर पाळत ठेवत आहेत.

तरीपण झाकण चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी १ लाखपेक्षा जास्त मॅनहोल आहेत. त्यापैकी शहरात २५ हजार तर पूर्व-पश्चिम उपनगरात सुमारे ७६ हजारांहून अधिक मॅनहोल आहेत.

मॅनहोलची झाकण लोखंडी असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. भंगारमध्ये झाकणांचा मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे गर्दुल्ले, भिकारी व अन्य काही चोरटे या झाकणांची रात्रीच्या वेळी चोरी करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे राहतात.

झाकणांच्या होणाऱ्या सततच्या चोरीमुळे मुंबई महापालिकेने चोरीला गेलेल्या झाकणाच्या जागी नवीन झाकण बसवण्यासाठी कंत्राटदाराचीच नियुक्ती केली आहे. आता दक्षिण मुंबई, मध्य मुंबईतील मॅनहोलवरील झाकणे बदलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन वर्षासाठी हे कंत्राट देण्यात येणार असून ९० लाख ३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अशाच प्रकारे पूर्व व पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

झाकणांची किंमत ९ ते २२ हजारापर्यंत

६०० मिलिमीटर व्यासाच्या गोलाकार बिडाच्या झाकानांसाठी पालिका ९ हजार ७२ रुपये तर आयताकार बिडाच्या झाकण्यासाठी प्रति झाकण सुमारे १६ हजार ४४० ते २२ हजार ४९२ रुपये करतोय येतो. त्यामुळे झाकण चोरी झाल्यास मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

सेन्सर योजनेची केवळ चर्चाच

झाकणांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्यामुळे पालिकेने मॅनहोलच्या झाकणाला सेन्सरसह सायरन बसवण्याचा निर्णय घेतला होता. चोरट्याने झाकण उघडायचा प्रयत्न केल्यास सायरन वाजणार होता. पण या योजनेची केवळ चर्चा झाली. अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT