Mumbai Manhole Accident Video: मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच साकीनाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने अस्लम शेख या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
फोनवर बोलत चालताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथील खैरानी रोडवर मॅनहोलच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे मॅनहोलचे झाकण काढण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था किंवा बॅरिकेड्स नसल्याचा आरोप केला जात आहे.
याच वेळी अस्लम शेख हे फोनवर बोलत त्या रस्त्याने जात होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे त्यांना उघडा मॅनहोल दिसला नाही आणि ते थेट सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळले.
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मॅनहोल उघडे असल्याचे आणि जवळच कामगार उभा असल्याचे दिसते. अस्लम शेख चालत येतात आणि काही क्षणांतच ते मॅनहोलमध्ये पडतात. त्यानंतर जवळील कामगाराने तातडीने आत डोकावून पाहिले आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महानगरपालिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जोरदार पाऊस आणि गटारातील पाण्याच्या प्रवाहामुळे बचावकार्यात अडथळे आहे. अखेर सुमारे तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर अस्लम शेख यांना मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक नागरिक आणि मृताच्या कुटुंबीयांनी या दुर्घटनेसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेड, फलक किंवा सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे पावसाच्या पाण्याखाली असलेला मॅनहोल अस्लम शेख यांना दिसला नाही.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, नेमका हलगर्जीपणा कुणाचा होता याचा तपास सुरू आहे. उघड्या मॅनहोलमुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याने मुंबईतील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.