Mumbai Narcotics Seizure Pudhari
मुंबई

Mumbai Narcotics Seizure: लोकमान्य टिळक टर्मिनसवर १२ किलो चरस जप्त; दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या वरळी अमली पदार्थविरोधी कक्षाची कारवाई; १२ किलो २०० ग्रॅम चरस हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. वरळी युनिटच्या पथकाने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ किलो २०० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची किंमत १२ कोटी २० लाख रुपये आहे.

मुंबईत अमली पदार्थांची खरेदी-विक्री, साठवणूक आणि पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वरळी युनिटचे पथक कार्यरत होते. या दरम्यान एलटीटी परिसरात दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार बुधवारी रात्री १०.४५ ते २५ नोव्हेंबर रोजी पहाटे १.४० या वेळेत पोलिसांनी परिसरात सापळा रचला. संशयित दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे १२ किलो २०० ग्रॅम चरस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.

अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चरसचा मूळ पुरवठादार कोण, हा अमली पदार्थ मुंबईत कुठून आणला जात होता आणि त्याचे वितरण कोणामार्फत केले जाणार होते, याचा तपास सुरू आहे.

या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले आहे. या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे. तपासावर परिणाम होऊ नये यासाठी अटक आरोपींची नावे पोलिसांनी उघड केली नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT