Mumbai Local Train Murder  Pudhari
मुंबई

Mumbai Local Train Murder : बोरीवली लोकलमधील चाकूहल्ला प्रकरणातील आरोपी अटकेत; कुर्ल्यातून रोशन सुवर्णला बेड्या

दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणाची केली होती चाकूने भोसकून हत्या

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Local Train Murder :

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई लोकल ट्रेनमध्ये आज (दि. २४) सकाळी मयंक लोहार (वय २२) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणाची चाकूने हत्या करून पसार झालेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. रोशन सुवर्ण असे आरोपीचे नाव असून, त्याला कुर्ला परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

पावसामुळे दरवाजा बंद करण्यावरून वाद

आज सकाळी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी रोशन सुवर्ण याने 22 वर्षीय मयंक लोहार याच्यावर चाकूने वार केले. लोक डब्यात एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत असलेल्या मयंकला मदत करण्याऐवजी अनेक प्रवासी भीतीपोटी दूर गेले. दरम्यान, आरोपी हातात चाकू घेऊन प्रवाशांना धमकावले. लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

रोशन सुवर्णला कुर्ला परिसरातून अटक

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान आरोपी रोशन सुवर्ण याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्याला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिस त्याची सखोल चौकशी करत असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्याच्याकडे चाकू कसा आला? याचाही तपास सुरू आहे.

रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भर गर्दीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT