वीस वर्षांत लोकल अपघातांत 52 हजार प्रवाशांचा मृत्यू! File Photo
मुंबई

Mumbai local train accidents : वीस वर्षांत लोकल अपघातांत 52 हजार प्रवाशांचा मृत्यू!

रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांना प्रवाशांसाठी वेळनाही; प्रवासी संघटनांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, स्वप्निल कुलकर्णी

लोकल ही मुंबईची ‌‘जीवनवाहिनी‌’ म्हणून ओळखली जाते. रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी लोकलचा वापर करतात. तथापि, गेल्या वीस वर्षांत पश्चिम रेल्वे मार्गावर 22,481, तर मध्य रेल्वे मार्गावर 29,321 अशा एकूण 51,802 प्रवाशांनी जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गर्दीमुळे धक्का लागून खाली पडणे, रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, ट्रेनमध्ये चढताना/उतरताना तोल जाऊन पडणे, ट्रेनमधून लटकून प्रवास करताना पडणे, अशी अनेक कारणे या अपघातांना कारणीभूत ठरली आहेत.

रेल्वेच्या बाबतीत तर कित्येक अभ्यास अहवाल, कित्येक शिफारशी बासनात बांधून पडल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी कळवा आणि मुंब्रा या दरम्यान झालेल्या अपघातात तेरा प्रवासी गाडीतून रुळावर पडले, त्यातल्या चौघांचे प्राण गेले. त्या घटनेनंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समीक्षा अहवाल आल्यानंतर दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही.

प्रयागराजच्या महाकुंभमध्ये किती जणांचा मृत्यू झाला? नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या चेंगराचेंगरीत किती जण ठार झाले? कोविड काळात मुंबई, महाराष्ट्रात किती जणांचा मृत्यू झाला? असे प्रश्न नेहमी ऐकायला मिळतात. पण लोकल अपघातात रोज आणि दरवर्षी किती मृत्युमुखी पडतात असा प्रश्न कोणी विचारत नाही. कारण ‌‘रोज मरे त्याला कोण रडे...‌’ अशीच भावना झाली आहे.मुंबईच्या उपनगरी रेल्वे अपघातात आणखी किती बळी जायला हवे म्हणजे सरकार आणि रेल्वे प्रशासनाला जाग येईल, असा संताप प्रवासी संघटनांनी व्यक्त केला आहे.

लाखो प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन कारवाई करणार आहे का? हा सवाल आहे. ज्यांच्यामुळे रेल्वेला एवढा महसूल मिळतो, त्या रेल्वे प्रवाशांच्या समस्येवर उपाययोजना करायला राज्य सरकारकडे वेळ नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अपघातांच्या वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री यांची वेळ घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ते आम्हाला वेळ देत नाहीत. राज्य सरकारला लाखो रेल्वे प्रवाशांबद्दल कोणतीही काळजी राहिली नाही असा त्याचा अर्थ होतो.
सिद्धेश देसाई, रेल्वे प्रवासी संघ
लोकलच्या अपघातांबाबत अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदने दिली मात्र त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. असे अपघात यापूर्वी अनेकदा घडले आहेत. पण लाखो रेल्वे प्रवाशांच्या अडचणीबद्दल रेल्वे प्रशासनाला, राज्य सरकारला कोणतीही ठोस उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती नाही. आणखी किती जणांचे बळी घेतल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे? लोकलच्या अडचणींवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही अनेकदा केली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही.
राजू कांबळे, कोकण रे. प्रवासी संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT