Railway Staff Shortage pudhari photo
मुंबई

Railway Staff Shortage : अपुऱ्या मनुष्यबळावर मुंबईत रेल्वेचा कारभार

मोटरमनची २९८ पदे रिक्त; केवळ ४,७९५ आरपीएफ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : श्रीकांत जाधव

उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर अपघात, प्रवाशांच्या हाणामारीचे प्रकार तसेच तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रवाशांचा प्रचंड ताण रेल्वेवर असताना महत्वाची हजारो पदे अजूनही रिक्त आहेत. अशा अपुऱ्या मनुष्यबळावर तिन्ही रेल्वेचा कारभार सुरू आहे. त्याचे पडसाद रेल्वेचे व्यवस्थापन तसेच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासावर होत असल्याचे दिसते.

मुंबईत मध्य रेल्वेचे जाळे विस्तीर्ण आहे. मध्य रेल्वेकडे केवळ ८,७८० लोकोपायलंट आजघडीला कार्यरत आहेत. दुसरीकडे पश्चिम रेल्वेची अवस्थाही काहीशी तशीच आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागासाठी १,८३० पदे मंजूर असताना केवळ ५८२ लोकोपायलंट कार्यरत आहेत. एवढा प्रचंड कामाचा व्याप लोकोपायलटवर असल्याने अतिरिक्त कामबंद आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला होता. अतिरिक्त ड्युटी व कमी विश्रांती घेत लोकोपायलट मेल एक्सप्रेस तसेच विशेष जलद गाड्यांचे काम करत आहेत.

मुंबईत केवळ ४,७९५ आरपीएफ

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात अनपेक्षित घटनांचे सत्र सुरू आहे. किरकोळ वादातून होणारे प्रवाशांचे वाद जीवघेण्यापर्यंत जात आहेत. नियमित लोकलला उशीर झाल्यास प्रवाशांचा प्रचंड रोष मोटरमनपर्यंत जातो. असुरक्षिततेच्या अनेक घटना घडत असताना मुंबईत केवळ ४,७९५ आरपीएफ आहे.

पश्चिम रेल्वेसाठी १९१८ पदे मंजूर असताना केवळ ८९७ आरपीएफ आहेत. मध्य रेल्वेकडे ३,७९५ आरपीएफ आहेत.आरपीएफची ही संख्या एवढ्या मोठ्या मुंबईसाठी प्रचंड तोकडी आहे. परिणामी रेल्वे प्रवासात अनेक घटनांमध्ये आरपीएफ सहजतेने उपलब्ध होत नाहीत.

तिन्ही मार्गांवर धावणाऱ्या लोकलसाठी जेवढी मोटरमनची संख्या आहे, त्या तुलनेत रेल्वे गार्डचा अभाव आहे. मध्य रेल्वेत ३,१६४ गार्ड कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वेकडे मात्र ३,१६४ गार्ड आहेत. रेल्वेत महत्वाच्या पदांची भरती ही एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्यामुळे नवीन भरतीला उशीर लागतो. नवीन अधिकारी जरी घेतले तरी त्याचे प्रशिक्षण होईपर्यंत थांबावे लागते. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने कामे करावी लागतात असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोटरमनची २९८ पदे रिक्त !

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची ६१५ पदे मंजूर असताना केवळ ५३६ मोटरमन कार्यरत आहेत. तसेच मध्य रेल्वेकडे मोटरमनची १,०७२ पदे मंजूर असताना ८५३ मोटरमन कार्यरत आहेत. जवळपास दोन्ही मिळून २९८ पदे अजूनही रिक्त आहेत. असे असताना वाढत्या लोकल गाड्यांचे संचलन या मोटरमनवर अतिरिक्त ड्युटी देऊन करून घेतले जात आहे.

सद्यस्थितीत मुंबई रेल्वेत कार्यरत मनुष्यबळ

पश्चिम रेल्वे

लोकोपायलंट - ५८२

मोटरमन - ५३६

आरपीएफ - ८९७

गार्ड - ६०९

मध्य रेल्वे

लोकोपायलंट - ८,७८०

मोटरमन - ८५३

आरपीएफ - ३,८९८

गार्ड - ३,१६४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT