भाईंदर ( मुंबई ) : गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर पुन्हा मंगळवारी (दि.19) मुसळधार पावसाने मिरा-भाईंदर शहर जलमय झाले आहे. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला, तर सखल भागातील घरा घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बघावयास मिळत आहे.
शहरातील पाणी निचरा घोडबंदर नदी, भाईंदर व जाफरी खाडीत होतो. मात्र भरतीच्या पाण्यामुळे मंगळवारी (दि.19) शहरात पाणी साठले. बेकरी गल्ली, टेम्बा रोड, उत्तन, पाली आदी भागांत कमरेपर्यंत पाणी साचले आहे. काही ठिकाणी पालिकेचे सक्शन पंप लावले असले तरी पाणी तिथेच परत टाकले जात असल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. पाली गावात चर्चमध्ये गेलेल्या नागरिकांना घरी परतण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागला.
दरम्यान, डंपिंग ग्राउंडमधील दूषित पाणी उत्तन–पाली भागात वाहून गेल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. साठलेल्या पाण्यामुळे पाली–उत्तन नाका मार्ग बंद झाला आहे. बस व रिक्षा सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
मीरारोडमधील मुन्शी कंपाऊंड, मिरा गावठाण, सिल्वर सरीता, कृष्णस्थळ, महाजनवाडी, दहिसर चेकनाका आदी ठिकाणीही पाणी शिरले आहे. महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असताना याच दरम्यान महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
घोडबंदर गावातही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी साठून घराघरात शिरलेले पहावयास मिळत आहे, असे स्थानिकांनी सांगितले. समुद्राला भरती आल्याने किनाऱ्यावरील मच्छीमारांची घरे जलमय झाली असून मोठ्या प्रमाणात किमती साहित्याचे नुकसान झाले आहे.